रचना क्र. 1
संतजीवन
श्री पेठेकाका
॥ सब संतन की जय ॥
नमन माझे विश्वात्मका ।
तसे गुरुपदप्रतीका ।
नमन माझे भाविका ।
जे जमती येथ ॥१॥
ही संतमंडळींची दया ।
राजी जाहले यावया ।
म्हणुनी वसे संतछाया ।
आनंदे घरी नांदे ॥२॥
संतछायेत प्रवेशता ।
नमन माझे समस्ता ।
प्रतिमामूर्त संतां ।
नमन माझे अमूर्तांही ॥३॥
नमन करावे येऊन ।
संतछायेत दैनंदिन ।
एरवी अनुसंधान ।
यांचे सतत असावे ॥४॥
प्रारब्धे धरिले देह ।
आम्हापरी भासती मानव ।
महाभूते आणि जाणीव ।
एकचि आहे ॥५॥
परि देह धरुनी हाती ।
संतांनी साधले या किती ।
देवप्रत्यय या जगती ।
आणिला सर्वांसाठी ॥६॥
असामान्य असती थोर ।
परि सामान्यांचे प्रेम फार ।
कसा होईल उद्धार ।
याची तळमळ वाटतसे ॥७॥
ठेवून आपुले दु:ख दूर ।
आम्हांसाठी कष्टती आयुष्यभर ।
घेती अमुचा प्रपंचभार ।
परमार्थही सांभाळिती ॥८॥
की व्हावा यांचा परमार्थ ।
एवढाचि त्यांचा स्वार्थ ।
अन्यथा त्यांचा त्यांना अर्थ ।
एकांतीच असतसे ॥९॥
म्हणून त्यांचे उपकार ।
स्मरण्या नमन वारंवार ।
उपदेश ठसो चित्तावर ।
आचरणही घडो निष्ठेने ॥१०॥
