मुख्य मजकूराकडे जा

परिचय

डॉ सुहास पेठे यांच्या विषयी थोडेसे...

डॉ. सुहास पेठे तथा श्री पेठेकाका हे महाराष्ट्रातील सातारा येथे वास्तव्यास असणारे एक तत्वज्ञ संत आहेत. वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांच्या आजीकडून त्यांना श्री गोंदवलेकर महाराज यांची शिकवण कळली. तसेच, त्याचवेळी योगायोगाने त्यांच्या एका शिक्षकांकडून त्यांना जागतिक कीर्तीचे तत्वचिंतक जे. कृष्णमूर्ती यांच्या अलौकिक विचारांचा परिचय घडला. तेव्हापासून आजवर एकीकडे नामसाधन व दुसऱ्या बाजूला ज्ञानमार्गाचा त्यांचा व्यासंग आजन्म सुरु आहे. श्री काकांनी तत्त्वज्ञान विषयातील विद्यावाचस्पती (पीएच्.डी.) ही पदवी, त्यांनी लिहिलेल्या इंग्रजी प्रबंधाने, सव्वीसाव्या वर्षी संपादन केली. वयाच्या अठराव्या वर्षापासून नोकरी करून त्यांनी हे शिक्षण व व्यासंग केला. लौकिक, प्रापंचिक कर्तव्ये सांभाळून अभ्यास, आचरण, प्रयोग व आत्मदर्शन असे टप्पे पार केले. त्याचबरोबर त्यांचा अनेक विषयांचा सखोल व व्यापक व्यासंग आहे. तर्कशास्त्र, मानसशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, बँकिंग, मानवसंसाधन, साहित्यकाव्यशास्त्र, अकौंटन्सी- अशा अनेक शाखांचाही त्यांनी अभ्यास केला. त्यात काही शास्त्रांमध्ये पदवी, पदविकाही संपादन केल्या. या विविध विषयांत त्यांनी मानद आमंत्रित व्याख्याते म्हणून अनेक संस्थांत कार्य केले आहे. ७५ पुस्तके, २०० पेक्षा अधिक स्वानुभवाधिष्ठित अभंगांचे लेखन व सुमारे ४०० पेक्षा अधिक संतपदे यांना त्यांनी भावपूर्ण चाली दिल्या व त्यांचे गायन केले आहे. लहानथोर सर्व व्यक्तींना मार्ग मिळावा म्हणून श्री पेठेकाकांनी ३६ साधनशिबिरे, ७२ मासिक बैठका, मुले व युवकवर्ग यांच्यासाठी स्वतंत्र सत्रे, सर्वांसाठी प्रश्नोत्तर सत्रे, खासगी चर्चासत्रे, ३०० आकाशवाणी चिंतने, वृत्तपत्रीय लेखन व लेखमाला, ५०० बोधवचने, आत्मपरीक्षण सत्रे- असा हा व्यापक व अमूल्य ठेवा निर्माण करून जिज्ञासूंच्या हाती दिला. श्रीकृपेने त्यात अजूनही नवीन भर पडत आहे.


माणूस, सृष्टी यांची दु:खे व त्यांचा निरास - हे श्री काकांच्या कार्याचे केंद्रबिंदू असून, विविधांगी व्यासंगाचा त्यांनी अगणित व्यक्तींना विनामूल्य लाभ आजन्म करून दिला आहे. ते माणुसकी हा धर्म मानतात, जगतात व नम्रपणे सर्वांसमोर विविध माध्यमांतून तळमळीने ठेवतात.


श्री काकांचे हे नि:स्वार्थकार्य शांतपणे तेवणाऱ्या "नंदादीपा"प्रमाणे अविरत चालू असून त्या प्रकाशात आजवर अनेक साधकांचे जीवनपथ उजळून निघाले आहेत.

साधननंदादीप विषयी थोडेसे...


या ॲपमध्ये तत्त्वज्ञ संत श्री पेठेकाका यांनी संकलित केलेले विविध संतांचे अभंग आणि श्री काकांनी स्वतः लिहिलेले अभंग, आरत्या, श्लोक, विविध नित्यपाठ, चिंतने व इतर प्रासंगिक रचनांचा समावेश आहे. या सर्व रचनांना श्री काकांनी अतिशय भावपूर्ण चाली दिल्या असून गेली सुमारे पस्तीस वर्षे जिज्ञासू साधक त्यांचा वैयक्तिक उपासनेसाठी व साधनेकरिता अभ्यासासाठी म्हणून उपयोग करीत आहेत. या ॲपच्या माध्यमातून श्री पेठेकाकांची सर्व प्रकाशित पुस्तके कालानुरूप PDF माध्यमातून जिज्ञासूंच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहोत. तसेच या माध्यमातून श्री पेठेकाकांच्या प्रकाशित Videos चा सुद्धा जिज्ञासूनां लाभ घेता येईल. अधिक Videos पाहण्यासाठी Shri Pethe Kaka या YouTube चॅनेलचा लाभ घ्यावा. श्रीकृपेने आजही या सर्व साहित्यामध्ये नवीन भर पडतेच आहे.


हा अमूल्य ठेवा कालानुरूप ॲपच्या माध्यमांतून जिज्ञासूंपर्यत पोहोचवताना आम्हाला विशेष आनंद होत आहे.