रचना क्र. 11
॥ श्री त्र्यंबकेश्वराष्टक ॥
श्री दासगणू महाराज · null
null
नमो प्रणतवत्सला भयहरा भवानीवरा
नमो परममंगला सकलवंद्य गंगाधरा
नमो पशुपते शिवा सकलव्यापका शंकरा
नमो पतितपावना तुजशि त्र्यंबकेशा हरा ॥१॥
बसून मन हे उगे विविध कल्पना त्या करी
तरंग वरच्यावरी उठति व्यर्थ नानापरी
म्हणून स्थिर ते करी मदिय चित्त सर्वेश्वरा
प्रसीद परमेश्वरा मजसि त्र्यंबकेशा हरा ॥२॥
असे पतित मी पुरा गणित पातकाला नसे
कळे परि त्यजावया मन मुळी न त्या घेतसे
समर्थ अकळावया खल - मनास तू ईश्वरा
प्रसीद परमेश्वरा मजसि त्र्यंबकेशा हरा ॥३॥
खरेच अवलोकिता जगि नसे कुणाचे कुणी
असे असुन वाढते उगिच प्रेम देवा मनी
गमे न मज प्रेम हे भवि बुडावया भोवरा
प्रसीद परमेश्वरा मजसि त्र्यंबकेशा हरा ॥४॥
प्रभो नुपजवी मनी उगिच प्रेम कोणाविशी
अलिप्त नलिनी जलातुन विभो तडागी जशी
तसे मजसि ठेवणे म्हणुन जोडितो या करा
प्रसीद परमेश्वरा मजसि त्र्यंबकेशा हरा ॥५॥
नको मजसि संतती तशिच संचया संपदा
परास मजपासुनी लवहि त्रास हो ना कदा
वरो सतत लीनता मन जसा लव्हाळा खरा
प्रसीद परमेश्वरा मजसि त्र्यंबकेशा हरा ॥६॥
पुनीत करण्या जना जशि जगात गोदावरी
तशीच तनुच्यामधे वसत एक बुद्धी खरी
परी विमल गौतमी-सम तिला कृपेने करा
तरेन मग मी भवी खचित त्र्यंबकेशा हरा ॥७॥
कदा न मजशी घडो प्रभुवरा असत्संगती
कुतर्क कधि ना शिरो सुखदशा सुभक्तीपथी
हरीहरपदी सदा मदिय हेत गुंतो खरा
गणू म्हणत पावणे मजसि त्र्यंबकेशा हरा ॥८॥
