रचना क्र. 12
झाले साधनाचे फळ...
श्री दासबोधामधून · null
null
जालें साधनाचें फळ ।
संसार जाला सफळ ।
निर्गुणब्रह्म तें निश्चळ ।
अंतरीं बिंबलें ॥ १ ॥
हिसेब जाला मायेचा ।
जाला निवाडा तत्त्वांचा ।
साध्य होतां साधनाचा ।
ठाव नाहीं ॥ २ ॥
स्वप्नीं जें जें देखिलें ।
तें तें जागृतीस उडालें ।
सहजचि अनुर्वाच्य जालें ।
बोलतां न ये ॥ ३ ॥
ऐसें हें विवेकें जाणावें ।
प्रत्ययें खुणेंसी बाणावें ।
जन्ममृत्याच्या नांवें ।
सुन्याकार ॥ ४ ॥
भक्तांचेनि साभिमानें ।
कृपा केली दाशरथीनें ।
समर्थकृपेचीं वचनें ।
तो हा दासबोध ॥ ५ ॥
वीस दशक दासबोध ।
श्रवणद्वारें घेतां शोध ।
मननकर्त्यास विशद ।
परमार्थ होतो ॥ ६ ॥
वीस दशक दोनीसें समास ।
साधकें पाहावें सावकास ।
विवरतां विशेषाविशेष ।
कळों लागे ॥ ७ ॥
ग्रंथाचें करावें स्तवन ।
स्तवनाचें काये प्रयोजन ।
येथें प्रत्ययास कारण ।
प्रत्ययो पाहावा ॥ ८ ॥
देहे तंव पांचा भूतांचा ।
कर्ता आत्मा तेथींचा ।
आणी कवित्वप्रकार मनुशाचा ।
काशावरुनी ॥ ९ ॥
सकळ करणें जगदीशाचें ।
आणी कवित्वचि काय मानुशाचें ।
ऐशा अप्रमाण बोलण्याचें ।
काये घ्यावें ॥ १० ॥
सकळ देह्याचा झाडा केला ।
तत्वसमुदाव उडाला ।
तेथें कोण्या पदार्थाला ।
आपुलें म्हणावें ॥ ११ ॥
ऐसीं हें विचाराचीं कामें ।
उगेंच भ्रमों नये भ्रमें ।
जगदेश्वरें अनुक्रमें ।
सकळ केलें ॥ १२ ॥
***
