रचना क्र. 458
ऐसा हा लौकिक कदा राखवेना
श्री तुकोबा
ऐसा हा लौकिक कदा राखवेना ।
पतितपावना देवराया ॥१॥
संसार करिता म्हणती हा दोषी ।
टाकिता आळसी पोटपोसा ॥२॥
आचार करिता म्हणती हा पसारा ।
न करिता नरा निंदिताती ॥३॥
संतसंग करिता म्हणती हा उपदेशी ।
येरा अभाग्यासी ज्ञान नाही ॥४॥
धन नाही त्यासी ठायीचा करंटा ।
समर्थासि ताठा लाविताती ॥५॥
बहु बोलो जाता म्हणती हा वाचाळ ।
न बोलता सकळ म्हणती गर्वी ॥६॥
भेटीसी नवजाता म्हणति हा निष्ठूर ।
येता जाता घर बुडविले ॥७॥
लग्न करू जाता म्हणती हा मातला ।
न करिता जाला नपुंसक ॥८॥
निपुत्रिका म्हणती पहा हो चांडाळ ।
पातकाचे मूळ पोरवडा ॥९॥
लोक जैसा ओक धरिता धरवेना ।
अभक्ता जिरे ना संतसंग ॥१०॥
तुका म्हणे आता ऐकावे वचन ।
त्यजुनिया जन भक्ती करा ॥११॥
