रचना क्र. 399
सदा विठ्ठलचिंतन घडो
श्री पेठेकाका · null
null
सदा विठ्ठलचिंतन घडो ।
नामघोष कानी पडो ॥१॥
कली दैत्य अंध युग ।
प्रकाश प्रेमळ पांडुरंग ॥२॥
भिती कोणाची कोणासी ।
पुरते ठावे त्या कलीसी ॥३॥
हात ठेवी कटीवर ।
पुरा धाऽक शत्रूवर ॥४॥
न करी शस्त्र सैन्य गोळा ।
पुरे सात्त्विक भक्तमेळा ॥५॥
जो जो नामासी लागला ।
कली शरण त्यासी आला ॥६॥
लढत अजब विठ्ठलाची ।
चित्ते पालटती शत्रूंची ॥७॥
दीन म्हणे लागो लळा ।
नित्य चिंतू या गोपाळा ॥८॥
