रचना क्र. 350
होई, जागृत रे जीवा
श्री पेठेकाका · null
null
होई, जागृत रे जीवा ।
देवा, सावध करि जीवा ॥धृ॥
शाश्वत कर्ता देव अंतरी ।
भरुनी राहे तो बाहेरी ।
कर्तृत्वाचा जीव भ्रम धरी ।
सावध करि जीवा ॥१॥ देवा..
प्रबळ जाहली देहबुद्धि किति ।
आत्मबुद्धिची पडे विस्मृती ।
आत्मनाश हा अवघा पुढती ।
वाचवि या जीवा ॥२॥
पैशासाठी ही लाचारी ।
स्वतंत्र असुनी दास्य पत्करी ।
दावी जगाला किति बेफिकिरी ।
जागवि या जीवा ॥३॥
चैन रंजना जिणे वाहती ।
मनगट मेंदू दुर्बल होती ।
स्वार्थ भयाने कितीक लढती ।
कळुद्या या जीवा ॥४॥
दीन म्हणे ही निद्रा जावो ।
सामर्थ्याची जाणिव होवो ।
संतकृपे स्वानंदा पावो ।
इतुका वर द्यावा ॥५॥
