रचना क्र. 346
नमू आत्मरूपास
श्री पेठेकाका · null
null
नमू आत्मरूपास, बुद्धिप्रकाशा ।
स्थैर्यास, शुद्धीस देई गणेशा॥१॥
नमू चेतनेला, नमू शारदेला ।
वाणी धरो, सत्यप्रेमव्रताला ॥२॥
नमू भूमि आधार, सर्वा जनांना ।
क्षमाशील राहून, जगवी जिवांना ॥३॥
नमू सूर्यदेवास, नित्यप्रकाशा ।
कर्तव्य, सातत्य, देई गतीशा ॥४॥
फळेपुष्पपानास, वृक्षा नमूया ।
देतात सेवा, समर्पून काया ॥५॥
नमू वास्तुदेवा, नमू स्थानदेवा ।
कुलस्वामिनी, आद्य कुलदेवदेवा ॥६॥
नमू श्रीगुरूसंत, सन्मार्गसाथी ।
बहूभाग्ययोगेच, सत्संग देती ॥७॥
नमू कर्ममार्गा, नमू भक्तिमार्गा ।
नमू मुक्ति देती, तयां सर्व मार्गा ॥८॥
नमू ‘आज’ या, वर्तमानक्षणास ।
लाभे कृपेनेच, ये प्रत्ययास ॥९॥
नमू शुद्ध जाणीव, प्रकटे जिवांत ।
तो देव होवोत, स्थिर अंतरात ॥१०॥
