रचना क्र. 342
ओवीचेनि मिसे
श्री रामदास स्वामी · null
null
ओवीचेनि मिसे, देव आठवावा ।
हृदयी धरावा, सर्वकाळ ॥१॥
सर्वकाळ मनी, स्वरूपाचा वेधु ।
तेणे भवसिंधू , तुटईल ॥२॥
तुटईल व्याधी, या जन्मकर्माची ।
जरी राघवाची, भक्ती घडे ॥३॥
भक्ती घडे भावे, सगुण देवाची ।
संगती देहाची, जव आहे ॥४॥
आहे देह तव, सगुणी भजावे ।
स्वस्वरूप व्हावे, आपणची ॥५॥
आपणची देव, आपणची भक्त ।
संतसंगे मुक्त, आपणची ॥६॥
आपणची सर्व, आपणची वाव ।
मीपणाचा ठाव, आपणची ॥७॥
आपण तूपण, जववरी अंतरी ।
तव भक्ती करी, सगुणाची ॥८॥
सगुणाची भक्ती,लोभाची विरक्ती ।
निर्गुणाची मुक्ती,सायोज्यता॥९॥
सायोज्यता मुक्ती, तुटला संदेहो।
बंधनेची वावो, दास म्हणे ॥१०॥
