रचना क्र. 337
संसार करिता
श्री रामदास स्वामी · null
null
संसार करिता ।
म्हणती हा दोषी ।
न करिता आळसी ।
पोटपोसा ॥१॥
भक्ती करू जाता।
म्हणती हा पसारा।
न करिता नरा ।
निंदिताती॥२॥
आचारे असता ।
म्हणती नाक धरी ।
येर अनाचारी ।
पापरूपी ॥३॥
सत्संग धरिता ।
म्हणती हा उपदेशी ।
येर अभाग्यासी ।
ज्ञान कैचे ॥४॥
बहु बोलो जाता।
म्हणती हा वाचाळ।
न बोलता सकळ।
म्हणती गर्वी ॥५॥
धर्म न करिता ।
म्हणती हा सांचितो ।
करिता काढितो ।
दिवाळे की ॥६॥
दिसा मरो नये ।
राती मरो नये ।
कदा सये नये ।
मागा पुढा ॥७॥
लोक जैसा वोक ।
धरिता धरेना ।
अभक्ती सरेना ।
अंतरीची ॥८॥
एैसा हा लौकिक ।
कदा राखवेना ।
पतितपावना ।
देवराया ॥९॥
दास म्हणे मज ।
तुम्हीच आधार ।
दुस्तर संसार ।
तारिजेल ॥१०॥
(संपादित)
