रचना क्र. 338
तवरि रे तवरि
श्री रामदास स्वामी
तवरि रे तवरि, परमार्थ स्वयंभ ।
जव पोटागीवरी, लोभ आला नाही ॥१॥
तवरि रे तवरि, अत्यंत सद्भाव ।
जव विशेष, वैभव आले नाही ॥२॥
तवरि रे तवरि, धीरत्वाची मात ।
जव प्रपंची, आघात जाला नाही ॥३॥
तवरि रे तवरि, डगमगीना कदा ।
जव देह्यासी, आपदा जाल्या नाही ॥४॥
तवरि रे तवरि, न घडे अवज्ञा ।
जव ते काही, आज्ञा केली नाही ॥५॥
तवरि रे तवरि, कडकडीत वैरागी ।
जव ते पोटी, भडागी जाली नाही ॥६॥
तवरि रे तवरि, ज्ञान ते सांगावे ।
जव ते न कुणी, मागावे अर्थ काही ॥७॥
तवरि रे तवरि, शब्दज्ञानसुख ।
जव संसारीचे, दुःख जाले नाही ॥८॥
तवरि रे तवरि, भवगजाचे भान ।
जव सद्गुरू पंचानन, देखिला नाही ॥९॥
