रचना क्र. 307
श्री ज्ञानेश्वरी नवव्या अध्यायाची आरती
श्री पेठेकाका · null
null
जय जय ज्ञानेश्वरी नवव्या अध्याया ।
देशी मार्ग सर्वा देव मिळवाया ॥ जय देव जय देव ॥धृ॥
अठरा अध्यायांत गीतार्थ आला ।
नवव्यामध्ये देव सर्वांचा झाला ।
सामान्यांचे प्रेमहि आहे देवाला ।
पापी अज्ञ जीवा आश्वासन झाला ॥१॥ जय देव..
ज्ञान भक्ती योग संन्यास आले ।
आदर राखुनि वेदा स्थान दाविले ।
सोपे नाम, कीर्तन महिमे गाईले ।
कर्ममार्गे कैसे चालावे भले ॥२॥ जय देव...
देवाला आवडे फळफूलपान ।
पाणी चाले, श्रेष्ठ भाव त्याहून ।
वडीलकीला लागे भक्तीचे ज्ञान ।
माऊलींचे जीवन त्याला प्रमाण ॥३॥ जय देव...
देव अकर्ता हा काय विचार ।
विपरित ज्ञान, भक्ती त्याज्य प्रकार ।
कोण्या रीती खरा देव मिळणार ।
रहस्य कळुनी दीना आनंद फार ॥४॥ जय देव...
