रचना क्र. 305
संतांची आरती
श्री पेठेकाका · null
null
गाऊ संतांची आरती । देव जागा करिती चित्ती ॥धृ॥
निर्गुण दुर्लभ देव झाला । त्यांनी सगुणात आणिला ॥१॥
स्वार्थी जीव जो गुंतला । त्याला परमार्थी लाविला ॥२॥ गाऊ..
खोटा कर्ता जो तो झाला । कोण कर्ता तो दाविला ॥३॥
प्रारब्धाची पुसली रेखा । यत्न देव हा ओळखा ॥४॥ गाऊ..
मिथ्या अशुद्ध देव गेले । शुद्ध देवांसी स्थापिले ॥५॥
सद्गुण स्वप्नीचे वाटले । त्यांनी जगुनीया दाविले ॥६॥ गाऊ..
लोकांसम हे जगती आले । मात्र मृत्यू पुसुनी गेले ॥७॥
सूक्ष्म रूपात राहिले । प्रमाण आजहि देती भले ॥८॥ गाऊ..
अपार बुद्धीचे सागर । केला सूक्ष्माचा व्यवहार ॥९॥
सोने मातीत दाखविती । मीपण सरता हाती देती ॥१०॥ गाऊ..
पैसा भपका केला दूर । साधेपणावरी भर ॥११॥
प्रेम नि:स्वार्थाचे भजन । अवघे त्यागाचे जीवन ॥१२॥ गाऊ..
त्यांच्या बोधाचे चिंतन । आम्हा घडो रात्रंदिन ॥१३॥
आचरणाची नित्य सेवा । दीन म्हणे घडो देवा ॥१४॥ गाऊ..
॥ सब संतन की जय ॥
