रचना क्र. 304
गुरुपदाची आरती
श्री पेठेकाका · null
null
जय देव जय देव जय श्री गुरुपदा ।
अनंतरूपे प्रकटुनि उद्धरिशी जगता ॥धृ॥
चार खाणींमध्ये जीव जन्मले ।
वासनायोगाने इहलोकी भ्रमले ।
स्वस्वरुपा विसरोनी देहमय झाले ।
जिज्ञासारूपाने तू जागृत केले ॥१॥
कोठुनि आला जीव ओळख तू देशी ।
जगी जगावे कैसे ते तू बोधीशी ।
कोठे जाणे जीवा ध्येय दावीशी ।
सार्थक जीवनाचे साधुनिया देशी ॥२॥
जेथे अडला जीव सावरण्या येशी ।
हाक देती आर्त तू प्रकट होशी ।
धर्म ना, पंथ ना, भेद ठेवीशी ।
छत्र आभाळापरि सर्वांवरि धरिशी ॥३॥
संत सत्पुरुष अन् अगणित अवतार ।
आजहि नाना रूपे घेशी आकार ।
वर्णन करण्या देवा तुमचे उपकार ।
दीना पडते अपुरे शब्दभांडार ॥४॥
