रचना क्र. 282
वेद बोलियेला त्रिविध वचन
श्री रामदास स्वामी
वेद बोलियेला त्रिविध वचन ।
कर्म उपासना आणि ज्ञान ॥१॥
ज्ञानाचा निश्चयो बोलिला वेदान्ती ।
आणि शास्त्रमति बहुसाल ॥२॥
बहुसाल शास्त्र पाहता सरेना ।
आयुष्य पुरेना जन्मवरी ॥३॥
जन्मवरी वाया संदेही पडावे ।
केधवा घडावे समाधान ॥४॥
समाधान घडे साधुचे संगती ।
गीताभागवती हेचि आहे ॥५॥
हेचि आहे सार जाणावे साचार ।
करावा विचार शाश्वताचा ॥६॥
शाश्वताचा भाव सर्वाठायी पडे ।
जरी काही घडे संतसंग ॥७॥
संतसंगे देव पाविजे तत्त्वता ।
शास्त्रे धांडोळिता आढळेना ॥८॥
आढळेना जनी दिसेना लोचनी ।
तया साधुचेनि पाविजेते ॥९॥
पाविजेते निजस्वरूप आपुले ।
मन भांबावले जिये ठायी ॥१०॥
जिये ठायी सर्व तुटती आशंका ।
तेचि लाभे एका साधुसंगे॥११॥
साधुसंग सत्य मानावा अंतरी ।
वेगी सोय धरी आलिया रे ॥१२॥
आलिया रे संग साधुचा धरावा ।
संसार तरावा साधुसंगे ॥१३॥
साधुसंगे ज्ञान रामदासी जाले ।
शरीर लागले भक्तिपंथे ॥१४॥
