रचना क्र. 281
अंतरीची वेथा
श्री रामदास स्वामी · null
null
अंतरीची वेथा श्रीरामासमर्था ।
जाणवल्या चिंता दूरी करी ॥धृ॥
जाणे सुखदुःख राम माझा येक ।
येर ते मायिक, वैभवाची ॥१॥
वैभवाची सखी, वोरंगोनि जाती ।
आत्माराम अंती, जिवलग ॥२॥
जिवलग नाही, श्रीरामावाचूनी ।
हाचि माझे मनी, दृढभाव ॥३॥
भाव अन्यत्रांचा, आहे वरपंगाचा ।
रामेवीण कैचा, अंतरीचा ॥४॥
अंतरीची वेथा, श्रीरामासमर्था ।
जाणवल्या चिंता, दूरी करी ॥५॥
करी प्रतिपाळ शरण आलियाचा ।
राम त्रैलोक्याचा, मायबाप ॥६॥
मायबाप धन, सज्जनसोयरा ।
येका रघुवीरावीण, नाही ॥७॥
नाही मज चिंता, श्रीराम असऽता ।
संकटी बोहाता, उडी घाली ॥८॥
उडी घाली मज, अनाथा कारणे ।
राम सर्व जाणे, अंतरीचे ॥९॥
अंतरीचे गूज, राम सर्व बीज ।
रामदासी निज, प्रगटले ॥१०॥
