रचना क्र. 242
उठा उठा रे लवकरी
श्री निरंजन रघुनाथ · null
null
उठा उठा रे लवकरी,
सत्वर यावे शुद्धीवरी ।
उघडा कपाटें अंतरी,
ज्ञानदृष्टी अवलोका ॥धृ॥
आले आहे विघ्न भारी,
काळ टपला तुम्हांवरी ।
नित्य करीताहे चोरी,
आयुष्याची तुमच्या ॥१॥
सरला चौऱ्यांशी तम,
नरतनु आलि अनुक्रम ।
इचा मानूनी संभ्रम,
ज्ञानदृष्टी उघडा रे ॥२॥
सद्गुरुवचनाचा उदय,
प्रकाश जाला भानूदय ।
जागे व्हा रे मनोमय,
स्वरूप पहा आपुले ॥३॥
वाचे घ्या रे रामनाम,
निरंजन सांगे उत्तम ।
तुमचा हरेल भवभ्रम,
निर्भय व्हाल अंतरी ॥४॥
