रचना क्र. 132
मी नाही पाहिला, मी नाही देखिला
कै. जगन्नाथपंत आठवले · null
null
श्री ब्रह्मचैतन्यासारिखा नाही पाहिला ।
मी नाही पाहिला । मी नाही देखिला ॥१॥
मी बहुत वाचियेले ।
मी बहुत ऐकियेले ।
मी बहुत धुंडियेले ।
ऐसा नाही पाहिला ॥२॥
तो मुलांमध्ये असे ।
तो स्त्रियांमध्ये बैसे ।
पण ऐसा निर्विकारी ।
जगी मी नाही पाहिला ॥३॥
तो माया मोह पाळी ।
काय करतील लेकुरवाळी ।
पण कामक्रोधा जाळी ।
ऐसा नाही पाहिला ॥४॥
काही नसे त्याचे घरी ।
पण कुबेर लोळे दारी ।
तो वाटेल तेचि करी ।
ऐसा नाही पाहिला ॥५॥
तो म्हणवी अज्ञानी ।
पण ज्ञानियांचा ज्ञानी ।
तो वेदगूढ जाणी ।
ऐसा नाही पाहिला ॥६॥
तो ज्यासी म्हणे घर ।
तेथे मोकळा दरबार ।
पण नांदे रघुवीर ।
ऐसा नाही पाहिला ॥७॥
जो जाई एकवार ।
तो विसरे घरदार ।
त्यासी देई नामसार ।
ऐसा नाही पाहिला ॥८॥
तो गोंदावलेकर ।
त्याचे पायी मुक्ती चार ।
दासदासाचे माहेर ।
ऐसा नाही पाहिला ॥९॥
