रचना क्र. 5
कळो आले कोण
श्री पेठेकाका
कळो आले कोण करितसे राखण ।
लाभावीण शीण कोण करी ॥१॥
कोण करी मज साह्य वेळेवरी ।
कोण ओझे शिरी घेई माझे ॥२॥
घेई माझे पाप करवी अनुताप ।
वर पुण्याचे माप पदरी घाली ॥३॥
पदरी घाली सुख समाधान सकळ ।
मज खळासी प्रेमळ कोण होय ॥४॥
कोण होय प्रसन्न न करिता साधन ।
चुकता रडता कोण पोटी धरी ॥५॥
पोटी धरी सद्गुरू तोचि सूत्रधार ।
न पडो आता विसर , दीन म्हणे ॥६॥
