रचना क्र. 33
गुरुची कृपा कधी कळेल
श्री पेठेकाका · null
null
गुरुची कृपा कधी कळेल,
मजला कृपा कशी कळेल
किती, कुठे सांभाळितो कळेल,
गुरुची कृपा कधी कळेल ? ॥धृ॥
अभिमान मज देहाचा,
थाट पहा माझ्या बुद्धीचा
दिली कोणी कसे कळेल,
गुरुची कृपा कधी कळेल ? ॥१॥
घरदार माझे पाही,
मिळकतीचा हेवा होई
कोणी सारे दिले कळेल,
गुरुची कृपा कधी कळेल ? ॥२॥
पती पत्नी मुले बाळे,
मित्र गोत्र सारे सोहळे
कोण टिकवितो कळेल,
गुरुची कृपा कधी कळेल ? ॥३॥
येण्याआधी विघ्ने निवारी,
सावरितो आल्यावरी
मज हे कधी कळेल,
गुरुची कृपा कधी कळेल ? ॥४॥
उद्धाराची चिंता वाही,
कल्याणाची दिशा देई
कोण माझ्यासाठी कळेल,
गुरुची कृपा कधी कळेल ? ॥५॥
दीन म्हणे गुरुराया,
तूचि होशी छत्रछाया
कळले, हे कसे टिकेल,
गुरुची कृपा कधी कळेल ? ॥६॥
