रचना क्र. 11
अर्पणमाला
श्री पेठेकाका · null
null
॥श्री॥
॥ श्रीराम ॥
संकल्पित सामुदायिक नामजपाची सांगता
अर्पणमाला
विघ्नहर्त्या मोरयाचे। स्मरण करूनिया वाचे॥
तसेच करूनी सर्व देवांचे। कृपा प्रार्थू प्रारंभी ॥१॥।
वंदिले विविध गुरू। आणि विशेषे सद्गुरू॥
ब्रह्मचैतन्य कृपासागरू। साष्टांग तोही वंदिला ॥२॥
कलियुगी नामावतार। ते ब्रह्मचैतन्य थोर॥
ज्यांचे स्मरणेही उद्धार। प्राणियांचा होतसे ॥३॥
ज्यांची थोरवी जाणणे। ज्यांचे स्वरूप ओळखणे
अशक्य शब्दांत आणणे। ज्यांची कृपा ॥४॥
ज्यांचा मार्ग नामाचा। भगवंताच्या स्मरणाचा॥
जगी पाही अनुभवाचा। बहुत जन चालती ॥५॥
मार्ग पुरातन अनादी। आरंभी बोलिलाही वेदी॥
मस्तकी धरिला संतांदी। हरिपाठी विवरिला ॥६॥।
सामान्यांसी सोपा मार्ग। भक्तभगवंताचा संग॥
स्मरण मिळविता प्रयाग। त्रिवेणी जाहला ॥७॥
नामतीर्थी जे नाहले। स्मरणे पवित्र झाले॥
अहोभाग्य उदेजले। पूर्वपुण्ये तयांचे ॥८॥
कर्तव्यात देवाचे स्मरण। करिता होय प्रसन्न॥
न लागे करावी वणवण। भगवंताकारणे ॥९॥
कर्म जसे अविरत। स्मरणही व्हावे सदोदित॥
स्मरणाकारणे शिकस्त। प्रयत्नांची करावी ॥१०॥
स्मरणासि कारण नाम। सामान्यांसि अतिसुगम॥
शोधुनी निगमागम। सार काढिले नामाचे ॥११॥
नाम किती निरुपाधिक। सोपे फुकाचे अलौकिक॥
जात विद्या वय बंधक। काहीच नसे ॥१२॥
स्त्री असो पुरूष असो। व्याधि उपाधि मुक्त असो॥
वाचा तीही असोनसो। परी अधिकारी नामाचा ॥१३॥
याकारणे श्री महाराजांचा। नामावरी कटाक्ष साचा॥
“नाम हाचि प्राण माझा”। ऐसी खूण बोलती ॥१४॥
त्या खुणेलागी स्मरून । नाम घेती असंख्य जन॥
श्रींची त्यापरि संगती साधून। सार्थक जन्माचे करिती ॥१५॥
ऐसेचि सांप्रत काळी। साधक आले जवळी॥
श्रींच्या कृपेने मांदियाळी। साधतसे सर्वांची ॥१६॥
श्रींना आवडते ते शिकणे। शिकल्याचा अंमल करणे॥
नामस्मरण मुख्यपणे। सहसाधनी घडतसे ॥१७॥
पंथ वेगळाले होती। नाना नामे देवा भजती॥
परि श्रींचे पायी प्रीती। सर्वांठायी वसतसे ॥१८॥
उपासना गुरू नाना। परि नामी निष्ठा सर्वांना॥
परमानंदे नामसाधना। तळमळीने साधिती ॥१९॥
श्रींची नामी अतिप्रीती। म्हणुनी नाम घेऊ संगती॥
त्यांच्या आवडीची कृती। करिता कृपा साधेल ॥२०॥
त्यांच्या आवडीचे करणे। आपुल्या ठायी कल्याण साधणे॥
याकारणे नाम घेणे। एक विचारे प्रेमाने ॥२१॥
भगवंताचे करुनी स्मरण। श्रींचे करुनी आवाहन॥
नामजपाचा संकल्प जाण। पूर्वपुण्ये सुटला ॥२२॥
कर्तव्यी न करिता कसूर। प्रसंग पाहुणे घरदार॥
तैसे तुष्ट राखुनी परिवार। नाम अखंड साधिती ॥२३॥
धंदा नोकरीची लगबग। गणगोत प्रकृतीचे प्रसंग॥
नामी अनुसंधान परि अभंग। आपुल्या कृपेने साधले ॥२४॥
नामाला गोडी नसता। कोठुनी आवडते आता॥
कैसा चाळा लागला चित्ता। सानथोरी अनुभवले ॥२५॥
व्यर्थ बोलणे गप्पा आता। मुळी न आवडती चित्ता॥
नाम चाले वेळ मिळता। हाती माळ असो नसो ॥२६॥
हे आपुलिये कृपेचे करणे। म्हणोनि संकल्प तडीस जाणे॥
उच्चारण्याचे धाडसही करणे। अशक्य वाटे अन्यथा ॥२७॥
संकल्पाचिये गावी भेटले। कितीक नाममार्गी चालले॥
सांगतेचिया मुक्कामा आले। आजि धन्य होउनी ॥२८॥
त्यांचे नामोच्चार पुढे केले। आपुल्या पायी निवेदिले॥
ज्ञातासवे अज्ञातही आले। आपुलिये चरणतळी ॥२९॥
हे भक्तभावाने निवेदन। लौकिक नामांचे उच्चारण॥
खरे कर्ते जाणते आपण। मनी खूण धरितसो ॥३०॥
राहुनी राहुनी वाटे मना। नामाचे महत्त्व अजुनी कळेना॥
आपुल्या कृपेची योजना। अतर्क्य आणि अपार हो ॥३१॥
यालागी चरणालागुन। जप करितो अर्पण॥
कोणी केला किती कोठून। मागमूसही मनी नसो ॥३२॥
नामाचे प्रेम देणे। अधिकउण्या क्षमा करणे॥
दीना पायी राखणे। दुजे मागणे नको नको ॥३३॥
- जानकी जीवन स्मरण जय जय राम -
