रचना क्र. 2
संकल्प, आवाहन, प्राणप्रतिष्ठा
श्री पेठेकाका · null
null
श्री गणेशाय नम: ॥
श्री सरस्वत्यै नम: ॥
श्री सद्गुरवे नम: ॥
देववाणीस नमुनी, मराठी मंत्र हे दिले ।
शारदा प्रेरणेने जे, कळण्या करण्या भले ॥
उपचार करणे म्हणणे, व्हावे सुलभ त्यातुन ।
दक्षिणा मात्र वेदज्ञा, देणे आदरपूर्वक ॥
शुचिर्भूतपणे बसुनी देवासन्मुख आसनी ।
उच्चार करणे आता कृतीची जोड देउनी ॥
प्रार्थना हे गणेशा तुज, भावे वंदन मी करी ।
विघ्ने सर्व हरूनिया, नेई कार्यास सिद्धिला ॥
सुपारीच्या गणेशाला, पूजा उपचार अर्पिणे ।
खोबरे गूळ नैवेद्य, दाखविणे नमनासह ॥
॥श्रीराम॥
ओंकारात खरा एक, तोच विष्णु सहस्रश: ।
नामे चोवीस ती त्याची स्मरणे नमुन नित्यश: ॥
पळीत घेउनी पाणी पिणे ते स्मरणपूर्वक ।
आचमन हाच आरंभ पूजेचा शुभकारक ॥
केशवा पहिले नमन दुसरे नारायणास ते ।
माधवा तिसरे नमन गोविंदा चवथे असे ॥
विष्णूस पाचवे नमन सहावे मधुसूदना ।
सातवे त्रिविक्रमाला ते, आठवे नमन वामना ॥
नववे श्रीधरा नमन हृषीकेशास दशम ते ।
पद्मनाभास अकरावे दामोदर नमू मने ॥
संकर्षणास तेरावे चौदावे वासुदेव हे ।
पंधरावे नमन प्रद्युम्ना सोळावे अनिरुद्ध हे ॥
पुरुषोत्तम सतरावे हे अठरावे श्री अधोक्षजा ।
नारसिंहास नमन विसावे अच्युतास हे ॥
जनार्दन एकवीसावे बाविसावे उपेन्द्र हे ।
तेविसावे नमू हर हे श्रीकृष्णाय नमो नम: ॥
प्राणायाम करू नंतर घेऊ हातात अक्षता ।
समजुनी म्हणुया मंत्र पूजासंकल्प सोडता ॥
महागणपतिस्मरण, श्रीगुरूंचे तसे करू ।
सरस्वती, वेद, वेदपुरुष, इष्टदेव नमू तसे ॥
कुलदेवता स्थानदेव, तशी ती वास्तुदेवता ।
शचीपुरन्दर आदिक या, नमुया सर्वदेवता ॥
उमामहेश्वरांस नमन, आईवडिलही नमू ।
कालकामपरशुराम सर्व देव तसे नमू ॥
नमुया ब्रह्मवृंदांस निर्विघ्न सर्व हे असो ॥
सुमुख-एकदन्त अन्, कपिल गजकर्णक ।
लम्बोदर तसा विकट, विघ्ननाशक, गणाधिप ॥
धूम्रकेतु, गणाध्यक्ष, भालचंद्र, गजानन ।
बारा पवित्र नामे ही, म्हणे जो ऐकतो तसा ॥
विद्यारंभ, विवाहात, येता, जाता कुठे कसा ।
संग्रामी, संकटी त्याला, विघ्न ना येतसे कधी ॥
॥श्रीराम॥
इतुका मंगलाचरण संक्षिप्त करुनी अता ।
उच्चारू आज दिवसाची जी जी शक्य विशेषता ॥
शालिवाहन शकातील शार्वरी संवत्सर हे असे ।
दक्षिणायन, ऋतु वर्षा, भाद्रपद शुद्ध पक्ष हा ॥
त्यातील चतुर्थी तिथि चे, हस्त नक्षत्र योग जे ।
करण, वार यांचाही, उच्चार करणे इथे ॥
ऐशा गुणविशेषांची तिथी ही शुभकारक ।
स्मरुनी संकल्प करुया आता कल्याणकारक ॥
माझ्या तशा कुटुम्बाच्या परिवाराच्या तशाच त्या ।
आरोग्यक्षेम स्थैयार्थ शान्तिऐश्वर्य वाढण्या ॥
घडण्या मंगल सर्वांचे होण्यास प्रगती तशी ।
श्रुतिस्मृतिपुराणात दिलेले फल साधण्या ॥
मातृभाषेत संक्षिप्त, मंत्रांसह करु पूजन ।
श्री मृण्मय गणेशाचे भावे उपचारपूर्वक ॥
एवढे स्मरुनी सारे अक्षतांसहित जल तसे ।
ताम्हनात तसे सोडू, पूर्ण संकल्प जाहला ॥
॥श्रीराम ॥
आता मृण्मय गणेशात प्राणांची स्थापना करू ।
आकारा मूर्ति येण्याच्या क्रियांचे स्मरण ते करू ॥
त्यासवे अक्षरे दिव्य काही उच्चारणे तशी ।
भरती ती प्राण मातीत सजीव करित मूर्तिला ॥
॥श्रीराम ॥
हेरंब स्मरणामध्ये माती आणून भिजवणे ।
सुमुखाचे नाम घेऊनी मूर्ती ही शुद्ध घडविणे ॥
गौरीसुतास नमुनी मूर्तीची स्थापना करू ।
मंत्रांनी मूर्तिच्या मध्ये, प्राण आता असे भरू ॥
ब्रह्माविष्णुमहेश्वर हे, मंत्रांचे ऋषि होत या ।
चतुर्वेद असे छंद, क्रियामय शरीर हे ॥
प्राण ही देवता येथे आं हे बीज इथे असे ।
ऱ्हीं शक्ति क्रौं कीलक ही प्राणांची स्थापना असे ॥
आता जशी दिली येथे उच्चारी अक्षरे तशी ।
प्राणावाहन होण्यास तीन वार क्रमे तशी ॥
ॐ आं ऱ्हीं क्रों अं यं रं लं वं शं षं सं हं ळं क्षं ।
उच्चारणे इथे येवो, प्राण मूर्तीत स्थिर असो ॥
ॐ आं ऱ्हीं क्रों अं यं रं लं वं शं षं सं हं ळं क्षं ।
उच्चारणे इथे येवो, जीव मूर्तीत मृण्मय ॥
ॐ आं ऱ्हीं क्रों अं यं रं लं वं शं षं सं हं ळं क्षं ।
तिसऱ्या उच्चारणे आता, येवो मूर्तीत सर्वही ॥
वाचा इंद्रिये डोळे, कान आणिक जीभ ती ।
घ्राणेंद्रिय तसे अवयव, हातपायादि येउ दे ॥
सुखाने सर्व येऊन, येथे नांदोत सर्वदा ।
देहव्यापार होवोत, देवो घेवोत शुभ सदा ॥
प्राण संचारता मूर्ती, झाली स्थिर सजीव ही ।
पंधरा संस्कार होण्यास पंधरा ओंकार म्हणु अता ॥
आता न हलविणे मूर्ती, पायाशी वाहू अक्षता ।
सजीव गणपती आता पूजेची होय सिद्धता ॥
॥श्रीराम॥
प्रथम नमन ते कलशा, मुखी विष्णु वसे जया ।
कंठी रुद्र, तळी ब्रह्मा, मातृगण आत राहती ॥
कडेला सर्व समुद्र, सप्तद्वीप वसुंधरा ।
ऋग्वेद अन् यजुर्वेद, सामवेद, अथर्व ही ॥
यथासांग इथे वसती, गायत्रीही तशी वसे ।
सावित्री शांति देवोत, पुष्टी पाण्यात या असे ॥
पापहारिणी गंगा, तशी यमुना सरस्वती ।
नर्मदा, सिन्धु, कावेरी, गोदावरि तशी वसो ॥
येवोत देवपूजार्थ, कलशामध्ये वसोत त्या ।
पूजा गंधफुले वाहुन, कलशाची करणे तया ॥
घंटेची करणे पुजा, घंटा वाजविणे जरा ।
आवाहन सर्व देवा, असे जे मानिले असे ॥
पाणी पवित्र कलशातिल, घेउनी पुढिल पूजना ।
फुलाने शिंपडावे मग, पूजासाहित्य स्वत:सह ॥
आता ध्यान गणेशाचे हाती घेउनी अक्षता ।
एकदंत, शूर्पकर्ण, गजवक्त्र, चतुर्भुज ॥
ध्यावा प्रसन्नवदन, मने सिद्धिविनायक ।
पहिला उपचार म्हणुनी अक्षता वाहणे तया ॥
आवाहन गणेशाचे सुरराजार्चितेश्वर ।
अनाथनाथा, सर्वज्ञा, पूजेला गणनायका ॥
येई विनायका येथे, म्हणुनी आवाहितो तुला ।
आवाहनार्थ देवाला वाहणे, अक्षता पुन्हा ॥
नानारत्न अलंकारे, दिव्य आसन भूषित ।
मांडिले हे सुवर्णाचे, घ्यावे सिद्धिविनायका ॥
म्हणुनी आसना मूर्तीच्या, करावा स्पर्श किंचित ।
अक्षता वाहणे थोड्या आसनार्थ म्हणूनिया ॥
सर्वतीर्थांतुनी आले पाद्य चंदनयुक्त हे ।
फुलाने वाहतो पायी, स्वीकारी भक्तवत्सला ॥
गंधपुष्प तसे पाणी, अक्षतांसह अर्घ्य हे ।
गणाध्यक्षा नमो तुजला, स्वीकारी करुणानिधे ॥
एकत्र करुनी तूप, दही, मध, पळीमध्ये ।
मधुपर्कस्नान स्वीकारा, सर्वलोकेश गणपती ॥
विनायका नमू तुजला त्रिदशैरभिवंदित ।
गंगोदक स्वीकारा पाणी आचमनीय हे ॥
तूप दूध दही साखर, मध हे पायि वाहतो ।
फुलाने पंचामृतस्नान स्वीकारा गणनायका ॥
स्नानानंतर शुद्धोदक फुलाने घालणे जरा ।
मग गंधपुष्प इत्यादी साधीशी करणे पुजा ॥
विडा फळावरी पाणी सोडणे अर्पिण्यास ती ।
ठेवणे मग फुले काढुन, निर्माल्य उत्तरेकडे ॥
आता महाभिषेकार्थ, अथर्वशीर्ष वाचणे ।
म्हणणे वा पुरुषसूक्त तसा संकल्प सोडणे ॥
