रचना क्र. 1
संपूर्ण संतनमनमाला
श्री पेठेकाका · null
null
(संतांच्या उपकारांचे स्मरण, संतछायेत स्थापित संतप्रतिमांच्या क्रमाने त्यांचे कार्य, उपदेश इ. चे स्मरण तसेच गुरुपद व अन्य सूक्ष्मरूप संतांचे ऋणस्मरण करण्यासाठी म्हटली जाणारी नमनमाला)
॥ सब संतन की जय ॥
नमन माझे विश्वात्मका । तसे गुरुपदप्रतीका ।
नमन माझे भाविका । जे जमती येथ ॥१॥
ही संतमंडळींची दया । राजी जाहले यावया ।
म्हणुनी वसे संतछाया । आनंदे घरी नांदे ॥२॥
संतछायेत प्रवेशता । नमन माझे समस्ता ।
प्रतिमामूर्त संतां । नमन माझे अमूर्तांही ॥३॥
नमन करावे येऊन । संतछायेत दैनंदिन ।
एरवी अनुसंधान । यांचे सतत असावे ॥४॥
प्रारब्धे धरिले देह ।आम्हापरी भासती मानव ।
महाभूते आणि जाणीव । एकचि आहे ॥५॥
परि देह धरुनी हाती । संतांनी साधले या किती ।
देवप्रत्यय या जगती । आणिला सर्वांसाठी ॥६॥
असामान्य असती थोर । परि सामान्यांचे प्रेम फार ।
कसा होईल उद्धार । याची तळमळ वाटतसे ॥७॥
ठेवून आपुले दु:ख दूर । आम्हांसाठी कष्टती आयुष्यभर ।
घेती अमुचा प्रपंचभार । परमार्थही सांभाळिती ॥८॥
की व्हावा यांचा परमार्थ । एवढाचि त्यांचा स्वार्थ ।
अन्यथा त्यांचा त्यांना अर्थ । एकांतीच असतसे ॥९॥
म्हणून त्यांचे उपकार । स्मरण्या नमन वारंवार ।
उपदेश ठसो चित्तावर । आचरणही घडो निष्ठेने ॥१०॥
नमन समर्था रामदासा । वैराग्यभक्तीच्या महापुरुषा ।
चेतविसी राष्ट्रपुरुषा । रामोपासना बळे ॥११॥
सुमुहूर्ती सावध होऊन । स्वजन स्वसुख त्यागून ।
आत्माराम करुनी प्रसन्न । घेतलासे तपोबळे ॥१२॥
अमुचे प्रपंचदास्य मोडो । आम्हा रामदास्य घडो ।
हनुमंत कुळस्वामी आवडो । इहपर स्वहित साधो ॥१३॥
नमन स्वामी निरंजना । श्री दत्त आणिले सगुणा ।
प्रपंचदेहही लाविला पणा । नमन तया तपासी ॥१४॥
प्रपंच-दु:खाचा अनुभव । घेती सर्वही मानव ।
परी तुमच्यापरी अनुभव । देवाचा कोण घेई ॥१५॥
केल्या अवीट पद्यरचना । केले सुबोध विवरणा ।
त्याच्या वाचनचिंतना । कृपा असावी निरंजना ॥१६॥
नमन श्री माणिकप्रभूंस । श्री दत्तप्रभू वाली जयांस ।
उपासना, निष्ठेने प्रभुपदांस । गाठले आपण साक्षात ॥१७॥
भक्तांस सदैव रक्षिता । दुष्टांसि शासन करिता ।
संकटी धावून येता । आजही आर्तांच्या ॥१८॥
दानधर्म अपार केला । भजनास निर्मिली पद्यमाला ।
भक्तकार्यकल्पद्रुमाला । काही अशक्य असेना ॥१९॥
श्री अक्कलकोट स्वामींस नमन । श्री दत्त, नृसिंहसरस्वती आपण।
कर्दळीवनी नृसिंहभान होऊन । आजानुबाहू प्रगटला ॥२०॥
सिद्धी, भूतभविष्यवर्तमान । स्वामी समर्थांपुढे हात जोडून ।
उभे असताही निरिच्छ राहून । कितीक जना उद्धरिले ॥२१॥
अतर्क्य भाषा, परीक्षा, सत्ता । परि शरणागतासी अभय देता ।
रावरंका लीला दाविता । प्रचीती आजही येतसे ॥२२॥
श्री निंबरगी महाराजांस नमन । प्रसिद्ध गुरुलिंगजंगम म्हणून ।
सिद्धगिरी कोल्हापुरचे मुनी मुप्पिन । यांनी गुरुपदेश दिला ॥२३॥
निळाऱ्याचा व्यवसाय सोडुनी । नेमासाठी मेंढपाळी पत्करुनी ।
तीन तपे गुप्तपणे नेम करुनी । सिद्धावस्था गाठली ॥२४॥
आचरण हेच खरे बळ । प्रपंचाचा विरक्तीने सांभाळ ।
आत्मप्रचीती सार सकळ । साधो आम्हा ही विनवणी॥२५॥
भक्तिभावे नमन श्री रामकृष्णांस । भूतळीच्या परमहंसास ।
निर्मळ अंतःकरण, सरळ स्वभावास । तसे नमन तपश्चर्येस॥२६॥
कालीमाता सजीव झाली । विकार आसक्ती नाश पावली ।
तंत्र शक्ती वैष्णव साधना झाली । सिद्ध अपुल्यापुढे ॥२७॥
सारदामाता लौकिक पत्नी । घडविली थोर अधिकारी साधनी ।
विवेकानंदादि शिष्यांना प्रेरणा देऊनी । युगधर्म प्रवर्तिला ॥२८॥
श्री पंतमहाराजांसी नमन । सद्गुरू बाळप्पांनी केले धन्य ।
विसाव्या वर्षी उद्धरून । दत्तभजनी लागला ॥२९॥
प्रपंच, कर्तव्ये, गृहस्थाश्रम । सांभाळिता लाविले प्रेम ।
भक्तमेळ्यांत हाती मर्म । अवधूत मार्गाचे दिले ॥३०॥
उदंड भक्त संप्रदाय । प्रेमलहरी, पदे अनुपमेय ।
दत्तभक्ती चिंतन-पाथेय । अपूर्व दिधले आम्हा ॥३१॥
शेगावीचे देववैभव । श्री गजानन महाराज दिव्य ।
निःस्पृह, निष्काम मूर्ती भव्य । नमन त्यांसी आदरे ॥३२॥
जन्मकुळग्राम टाकुनी । थेट उद्धारकार्यास लागुनी ।
अकारण वर्णकुळाभिमानी । जनांस धडा दिला ॥३३॥
पाणी, अन्न यांची महती । उपदेशिली समता, भक्ती ।
गजाननविजय वाचिता मुक्ती । तशी कृपा आजही लाभतसे ॥३४॥
श्री बीडकर महाराजांसी नमन । रामानंद नामे धन्य ।
प्रपंच परमार्थी अनन्य । पराक्रममूर्ती आपण ॥३५॥
श्री अक्कलकोट स्वामी प्रसन्न । घेतले आपण करून ।
पुढे मौलिक उद्बोधन । शिष्यहितासाठी केले ॥३६॥
परमार्थात नसे प्रारब्ध । सर्वत्र आपुला प्रयत्नवाद ।
आम्हा साधकांस आशीर्वाद। आपुला असावा संतवर्या॥३७॥
श्री भाऊसाहेबांस नमन । उमदी ग्राम केले धन्य ।
निंबरगी महाराजांस अनन्य । शिष्य आपण झाला ॥३८॥
भक्तीचा घालून दिला धडा । दासबोधाचा केला उलगडा ।
नेम, सप्ताह भरूनी घडा । वाहविले सर्वत्र ॥३९॥
शिष्योत्तम अंबुराव । आणि घडविले गुरुदेव ।
प्रयत्न आणि खरा देव । उपदेशिला अज्ञ जना ॥४०॥
श्री वासुदेवानंद सरस्वतींस नमन । त्रिखंड कीर्ती टेंब्येस्वामी म्हणून ।
असंख्य शास्त्र-विद्यांचे अध्ययन । उदंड शिष्य उद्धरिले ॥४१॥
माणगाव पूर्वजीवने धन्य । चातुर्मास्यांनी अनेक ग्रामे पावन ।
गरुडेश्वरी समाधी घेऊन । तीर्थक्षेत्र तया केले ॥४२॥
साक्षात देवांशी संवाद साधिला । आज्ञेने कठोर तप जगला ।
विपुल ग्रंथ, मंत्र प्रसाद दिधला । आम्हा साधकांना उद्धरावया॥४३॥
नमन श्री कृष्णदासांस । समर्थांनी देता दृष्टांतास ।
पाणके होऊन सेवेस । सज्जनगडी शरीर झिजविले ।४४॥
माहुलीच्या घाटावर । तपाचरण केले थोर ।
बालकांचे प्रेम फार । शिकविले किती तयांना ॥४५॥
अभ्यासे अध्यात्मकथन । प्रेमळ पदांचे लेखन ।
अल्पवयी समाधीगमन । अद्भुत वाटे आम्हाला ॥४६॥
नमन श्री साईबाबांस । धर्मपंथातीत महापुरुषास ।
भूवैकुंठ केले शिर्डीस । अतर्क्यपणे प्रकटुनी ॥४७॥
माणुसकीचा धर्म वाढविला । रामरहीम एक केला ।
श्रद्धा, सबुरी, परोपकार शिकविला । हितासाठी सर्वांना ॥४८॥
अतर्क्य लीला, ईशसत्ता । आपुल्यारूपे अनुभविता ।
दुजेप्रमाण नको आता । पावन आम्हांसी करावे ॥४९॥
श्री अरविंदांसी नमन । अद्भुत आपुले दर्शन ।
उपदेशिले दिव्य जीवन । आजीवन जगूनिया ॥५०॥
उच्च आंग्लविद्याविभूषित । क्रांतिकारकांचे दैवत ।
त्यागाने आयुष्य समस्त । तळपते आपुले ॥५१॥
सावित्रीसम महाकाव्य । असंख्य ग्रंथ पाथेय दिव्य ।
माताजीकृपे आश्रम भव्य । आम्हा प्रेरणा देतसे ॥५२॥
श्री बाबा महाराजांसि नमन । नमनभक्तीसही नमन ।
आत्मरूपी अखंड ध्यान । जपले आपण ॥५३॥
लौकिक अभियंते झाला । वरिष्ठांसि आदरपात्र जाहला ।
सद्गुरूंसी आवडते झाला । साधननिष्ठेने ॥५४॥
पिसेपणे आत्मानुभव झाकला । देता खूण ज्याची त्याला ।
बोट धरुनी आम्हाला । देवमार्गी न्यावे ॥५५॥
श्री जे. कृष्णमूर्तींस नमन । भाव असता नमन प्रयोजन ।
सात्त्विक क्रियांतही सावधान । नित्य केले आम्हा ॥५६॥
आपुले दु:ख बंध जाणावे । स्वत:च स्वहित शोधावे,साधावे ।
मुक्त स्वत:स करावे । तेच साह्य इतरांस ॥५७॥
जेथे प्रश्न तेथे उत्तर । नसे इतर कुणी जबाबदार ।
प्रकाश टाकिला जो अवघ्यावर। उपयुक्त असे आम्हांस॥५८॥
नमन श्री ज्ञानराज माउली । संतांनाही वाटे सावली ।
भक्तांवरी सदेह कृपा झाली । कृष्णपरमात्म्याची ॥५९॥
भक्तिमार्ग सोपा केला । भगवंत सर्वांचा झाला ।
अनुपम सुबोध सजवून दिला । गीतार्थ मराठियांना ॥६०॥
ओवी ओवी अमृतानुभव । शांत करी अगणित जीव ।
कैवल्याचा द्यावा अनुभव । संतछायेत सर्वांना ॥६१॥
नमन जगद्गुरू श्री तुकोबा । अनुभवांचा अलौकिक गाभा ।
गाथेची पसरली प्रभा । आज अवघ्या जगावरी ॥६२॥
पाखंड तोडून टाकिले । प्रेमळ भक्त प्रतिष्ठिले ।
कठोर साधन उपदेशिले । अनुभवशुद्ध वचनी ॥६३॥
विचार करण्या लाविले । भावे आकाशाएवढे केले ।
विठ्ठलाचे प्रेम वाढविले । ते आम्हा लाभो ॥६४॥
नमन श्री रमण महर्षींस । विरक्त मौनी साधूस ।
बाळपणी तपश्चर्येने स्वरूपास । साधले आपण ॥६५॥
खऱ्या मीचा करावा शोध । घेता तयाचा पूर्ण वेध ।
दु:खचिंतेचा संपतो संबंध । निरुपाधिक मार्ग आपुला ॥६६॥
आपुले हास्य निर्मळ । नि:शब्द संवाद प्रबळ ।
शुद्ध साधनविचारास बळ । सदैव आम्हा देतसे ॥६७॥
नमन श्री गुरुदेवांसी । कट्टर करुनी साधनासी ।
मांडिले साक्षात्कारशास्त्रासी । जिज्ञासू जनांसाठी ॥६८॥
परमार्थपाणिनी आपण । पौर्वात्य पाश्चिमात्य ज्ञान ।
वैराग्य गुरुप्रेम धन्य । भक्तिप्रयाग झाला ॥६९॥
प्रकृतीची नसता साथ । वर्षानुवर्षे केले साधनव्रत ।
आपुल्या कृपे लाभो साथ । तशा निष्ठेची आम्हा ॥७०॥
पूर्ण प्रेमादरे साष्टांग नमन । श्री केतकर महाराज धन्य ।
तात्या, आपुल्या इतुके अनन्य । क्वचित कुणी जाहले ॥७१॥
निष्ठेचा अपूर्व वारसा । स्वतःस विसरण्याचा आपुला वसा ।
मीचा पुसुनी गेला ठसा । अशक्य शक्य झाले श्रीकृपे ॥७२॥
मग आत्मज्ञान प्रगटले । ब्रह्मासी तादात्म्य झाले ।
कोणा कळे, कोणा न कळे । कारण तदाकार श्रीराम ॥७३॥
नमन श्री मामांना । धन्य दांडेकर कुलोत्पन्ना ।
जोगबुवांच्या शिष्यांत गणना । अग्रभागी आपुली ॥७४॥
लौकिक विद्यासंपन्न । अमोलिक केले अध्यापन ।
ब्रह्मचारी वर्गास भूषण । प्राचार्यही झाला ॥७५॥
ज्ञानेश्वरी सार्थ केली । प्रत्यक्ष जगून सांगितली ।
वारकरी परंपरा सांभाळिली । सत्कार्य वाटे प्रेरक ॥७६॥
नमन साध्वी अंबिकाबाईंस । केला नारिंग्रे ग्रामी वास ।
राणेस्थापित श्रीरामसेवेस । जीवन अखंड वाहिले ॥७७॥
अकाली पतिछत्र हरपले । पंढरिरायाने रामछत्र दिले ।
उपवासी शरीर कष्टविले । कर्तव्य तसे देवकार्यी ॥७८॥
आपुली गोसेवा धन्य धन्य । व्रतस्थता, रामनिष्ठा अनन्य ।
आशीर्वादे होवो राम प्रसन्न । आपुल्यापरी आम्हा ॥७९॥
नमन श्री स्वामी स्वरूपानंदांस । त्यागी, समाजसेवक, देशभक्तास ।
शांती, सद्गुरुनिष्ठा, साधनास । नमन कृतार्थतेस आपुल्या ॥८०॥
उत्कृष्ट बुद्धिमत्ता, अंतर्मुखता । आजाराच्या करुनी निमित्ता ।
प्रपंचादि कार्यांतून वळविता । झाला भगवंत कृपाळू ॥८१॥
प्रकृती क्षीण अकाली । सोऽहम् ध्यानी उपयोगा आली ।
जीवन्मुक्ती,जगदोद्धार साधून गेली । स्मरण राहो आम्हास ॥८२॥
श्री कलावती आईंस नमन । नमिला हरिहर तसा गोपाळकृष्ण ।
सफळ केले सिद्धारूढस्वामींचे शिष्यपण । खडतर साधन करुनी ॥८३॥
सोसले, पारखिले प्रपंची जन । न देता कोणासि दूषण ।
हरिनाम कीर्तन साधन । प्रतिकूलतेत टिकविले ॥८४॥
बालोपासना, भजनप्रेम । रुजविले आबालवृद्धांत नाम ।
आपुल्या हरिमंदिरीचे प्रेम । आजही लाभे घरोघरी ॥८५॥
श्री गणोरेबाबांना नमन । देशासाठी स्वसुख सोडून ।
त्यागी गणोरे म्हणून । सार्थ प्रसिद्धी पावला ॥८६॥
पुढे सांभाळिली निरपेक्षता । प्रपंच कर्तव्य करिता ।
साथ सीतामाईंची असता । साधन थोर केले ॥८७॥
देही असता देव गाठिला । मार्ग अनेका दाखविला ।
प्रेम कर्तव्य नामाला । आपुला मठही प्रेरक ॥८८॥
नमन श्री विश्वनाथबाबांना । डव्हे गावी मजुरी करताना ।
प्रिय झाला नाथनंगेबाबांना । शिष्य म्हणुनी आपण ॥८९॥
त्यांनी दिलेले कठोर साधन । चाकातीर्थी केले आचरण ।
साक्षात्कारे अवघे जीवन । पावन धन्य झाले ॥९०॥
अंतर्बाह्य शुद्धतेचा संदेश । आपण दिला साधकांस ।
गुरुनाम गाथा आम्हांस । आचरण्या बळ द्यावे ॥९१॥
नमन श्री निसर्गदत्तांस । मायापुरी मुंबईत वास ।
प्रारब्धे प्रयत्ने सहवास । सिद्धरामेश्वरांचा घडला ॥९२॥
त्यांनी दिली ओळखण । स्वरूप हेचि आपण ।
श्रद्धेने तीन वर्षे आचरण । अखंड आपण केले ॥९३॥
गाठली तेव्हा स्वरूपस्थिती । मग साक्षित्वे वावरला जगती ।
सुखसंवाद दिधला हाती । आम्हा साधकांच्या ॥९४॥
नमन श्री विनोबांस । अलौकिक प्रज्ञापुरुषास ।
अविश्रांत लोकसेवेस । नमन आपुल्या ॥९५॥
तसे नमन ब्रह्माचरणास । असंख्य भाषाविद्याकोविदास ।
अवघ्या धर्मांचा अभ्यास । अपूर्व गाढा आपुला ॥९६॥
गीताई असो वा भूदान । तेथे प्रज्ञा हृदय मीलन ।
तपश्चर्येचे आजन्म वळण । आम्हा साधकांना मिळो ॥९७॥
नमन श्री नाना महाराजांस । बालपणी घेतले अनुग्रहास ।
टेंबे स्वामींच्या कृपेस । पात्र आपण झाला ॥९८॥
तराणे ग्राम धन्य केले । कठोर तप आचरले ।
अनेक शास्त्रांचे मिळविले । प्रभुत्व आपण ॥९९॥
परी शिष्यांसाठी प्रेममूर्ती । आपण सांभाळिता जगती ।
साधनेस आम्हा गती । कृपा करून द्यावी ॥१००॥
श्री स्वामी वरदानंदांसी नमन । अद्भुत बाल्य, विलक्षण जीवन।
सद्गुरुनिष्ठा, समाधी निर्वाण । अतुलनीय कलियुगी ॥१०१॥
श्री साईबाबा, श्री दासगणू । कुणी घडविली मूर्ती म्हणू ।
व्यासंग, कीर्तन, वैद्यक वर्णू । कुण्या शब्दांत काय काय ॥१०२॥
अश्रद्ध, दुराचाऱ्यांवरी प्रहार । सदाचारी सज्जना मदतीस तत्पर ।
भाविका, साधका आधार । अप्पा, आपुला वाटे आजही ॥१०३॥
श्री ब्रह्मानंदांसी नमन । भजनाचे मूर्तिमंत साधन ।
भजनावलीरूपे आपण । अमर झाला ॥१०४॥
पुष्करतीर्थी लौकिक समाधी । प्रेरक परी साधी ।
उपदेशिली टाकण्या उपाधी । शुद्ध साधन करावे ॥१०५॥
हिंदी पदे रसाळ विपुल । मांडिती सिद्धांत विमल ।
साधन त्यांतील सकल । प्रेमे घडो आम्हा ॥१०६॥
नमन श्री परात्पर गुरुमाय । ब्रह्मज्ञानी श्री तुकामाय ।
उग्र परि प्रेमळ उपाय । भवरोगावरचा ॥१०७॥
दत्तकृपेचे अंशावतार । योग, वैराग्य, भक्ती साकार ।
चिन्मयानंदांचे शिष्य थोर । येहळेगाव तीर्थ केले ॥१०८॥
विठ्ठलभक्ती, कांदाभाकर । अभक्तांना शिव्या, भक्तांना प्रेमपाखर ।
ब्रह्मचैतन्य घडवुनी उद्धार। अगणित जिवांचा साधला ॥१०९॥
आणि दयासिंधु गुरुमाउली । ब्रह्मचैतन्यरूपे साकारली ।
गोंदवल्यास मूर्त झाली । नमन त्रिवार तियेला ॥११०॥
अनुसंधान अखंड राखावे । नामस्मरणे जीवन भरावे ।
भगवंतस्मरणात करावे । कर्तव्य आपुले ॥१११॥
अतिथी गरजूंस अन्नदान । वृत्त्यंतरी दक्ष राहून ।
निर्व्याज प्रेम आपल्यापासून । शिकावेसे वाटे ॥११२॥
जगजनाच्या उद्धाराची चिंता । जगदीशासि सदैव असता ।
निर्मिली असे गुरुपदव्यवस्था । विश्वामध्ये अवघ्या ॥११३॥
ती न जाणे धर्मपंथ । भेदभाव मानवनिर्मित ।
उद्धारप्रयत्नांत मदत । कोणासही करीतसे ॥११४॥
साह्य मागता आर्त होऊन । आकारा आणिते संत सज्जन ।
यास्तव कृतज्ञतेने करू नमन । गुरुपदप्रतीकास ॥११५॥
आणि तयां सर्वांना नमन । जे प्रतिमारूपे नसून ।
सूक्ष्म रूप धारण करून । असंख्य संत येथे ॥११६॥
सत्कार्याचे कौतुक धरून । पदावलीचे प्रेम वाटून ।
साधकांचे पाहून अंत:करण । रमले संत येथे ॥११७॥
त्यांनी सुखेनैव आनंदे रहावे । साधकांवरी कृपाछत्र धरावे ।
जीव उत्तम गतीस न्यावे । येथील अवघे ही विनवणी ॥११८॥
॥ सब संतन की जय ॥
