रचना क्र. 3
नमस्कारत्रयोदशी
कै. गोपाळराव फडके · null
null
महारुद्र जे मारुती रामदास ।
कलीमाजिं ते जाहले रामदास ।।
जनां उद्धराया पुन्हा प्राप्त होती।
नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ति ।। १ ।।
महाराष्ट्रि या माणगंगातिरातें।
असे पुण्य गोंदावलें क्षेत्र तेथें ।।
यजुर्वेदि विप्रगृहीं जन्म घेती ।
नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ति ।। २ ।।
न लिंपे कदा बालक्रीडाउपाधी ।
विवेकें सदा ज्ञान वैराग्य साधी ।।
जया सद्गुरूभेटिची होय स्फूर्ती।
नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ति ।। ३ ।।
समर्थानुयायी तुकाराम सिद्ध ।
जया पूर्ण वैराग्य अध्यात्मबोध ।।
तया प्रार्थूनी राममंत्रासि घेती।
नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ति ।। ४ ।।
तपें तोषला सद्गुरू ज्ञानियांचा ।
वदे वाढवीं पंथ या राघवाचा ।।
कलीमाजिं मंदावली धर्मभक्ती।
नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ति ।। ५ ।।
विदेहापरी चालवोनी प्रपंचा।
मुमुक्षूजनांलागि अध्यात्मचर्चा ।।
करोनी बहू लोक ते मेळवीती ।
नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ति ।। ६ ।।
जशी माउली ग्रास देते मुलाला ।
तसें बोधुनि ज्ञान पाजी जनांला ।।
धरेसारिखी ज्या वसे नित्य शांति ।
नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ति ।। ७ ।।
किती प्रार्थिती कामना पूर्ण व्हाया।
किती भाविती देहव्याधी हराया ।।
कृपादृष्टिनें त्यांसि आनंद देती।
नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ति ।। ८ ।।
जयें गोधना संकटीं रक्षियेलें ।
किती जीव अन्नोदकें तृप्त केले ।।
बहू मंदिरें स्थापिलीं, धन्य कीर्ती।
नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ति ।। ९ ।।
बहू अज्ञ जीवांप्रती उद्धरीलें।
तसें नास्तिकां सत्पथा लावियेलें ।।
समस्तांमुखें नाम हे बोलवीती ।
नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ति ।।१० ।।
तनू जीर्ण झाली, बहू कार्य केलें।
रघूनायकें शीघ्र पाचारियेलें ।।
तदा रामरूपीं समाधिस्थ होती।
नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ति ।। ११ ।।
समाधी पहातां समाधान होतें ।
तनू कष्टवी त्यासि आनंद देते ।।
मनीं भावितां कामना पूर्ण होती ।
नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ति ।। १२ ।।
मुखें बोलवी सद्गुरू बुद्धिदाता।
अहंभार हा वागवी कोण माथां ।।
जडो भावना रामदासी सदा ती ।
नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ति ।। १३ ।।
