रचना क्र. 461
श्री भावगीतेची आरती
श्री पेठेकाका · null
null
जय जय प्रेमळ भावगीते, जय भगवद्गीते । गीते, जय प्रेमळ गीते ॥
बोध सुगम दिधलास बुद्धि दे, आचरणा माते । माते आचरणा माते ॥धृ॥
ऐन प्रसंगी बुद्धि फिरते । मोह, अहंता कशी भुलविते ।
करुनि समर्थन, स्वतःच फसते ।
कृष्णसंगती सावध करुनी, भक्तांना तारिते ॥१॥ भक्तांना तारिते..
कर्म, ज्ञान, संन्यास, योग वा । स्वधर्म अपुला जाणुन घ्यावा ।
रूढी, भ्रम बाजूला ठेवा ।
मग हृदयातिल आत्मशक्तिही, साह्याला येते ॥२॥ साह्याला येते..
खरे सार ती अनन्यभक्ती । आज्ञापालन ही शरणागति ।
संशय, तर्क, विकल्पही जाती ।
पापपुण्य-भ्रम-भेद-बंधने, विलयाला जाती ॥३॥ विलयाला जाती..
कृपा देववाणीची झाली । भाव मराठीतून बोलली ।
जगण्या सर्वां सुलभ जाहली ।
हे परमात्मन्, दीनांकडुनी, घ्यावी ही आरती ॥४॥ घ्यावी ही आरती..
