रचना क्र. 416
अंगी ज्वर तया
श्री तुकोबा
अंगी ज्वर तया नावडे साकर ।
जन तो इतर गोडी जाणे ॥१॥
एकाचिये तोंडी पडिली ते माती ।
अवघे ते खाती पोटभरी ॥२॥
चारिता बळे येत असे दांती ।
मागोनिया घेती भाग्यवंत ॥३॥
तुका म्हणे नसे संचित हे बरे ।
तयासि दुसरे काय करी ॥ ४॥
