रचना क्र. 383
नाममार्ग हा सोपा
श्री पेठेकाका · null
null
नाममार्ग हा सोपा, धरि रे ।
वणवण करिसि फुका, का रे ?॥धृ॥
संसाराची चिंता निवारी ।
आशा, भय दूर करी ।
प्रारब्धही मागे सारी ।
अंतरंग शांत करी ॥
आडमार्ग धुंडिसि फुका, का रे ?॥१॥
दिशाभूल, भ्रम टळे ।
सत्यमिथ्या अवघे कळे ।
ऋद्धिसिद्धि धोका टळे ।
संतसंग सहज मिळे ॥
जगामागे जातोसि फुका, का रे ?॥२॥
दीन म्हणे बसल्या जागी ।
अवघे पाही लागे मार्गी ।
प्रेम, निष्ठा ठेवी जागी ।
गुरुखुणे विहरे जगी ॥
आटाआटी करिसी फुका, का रे ?॥३॥
