रचना क्र. 357
पर्जन्यप्रार्थना
श्री पेठेकाका · null
null
विश्वंभरा, जगदीश्वरा, दासांवरती करुणा करा ॥धृ॥
कृमीकीटकांचा जनिता अमुचाही तूच ।
ऊन्ह पावसाळा चक्रे चालविशी तूच ।
वृक्षांची काळजी आहे तुजला तितुकीच ।
नभचर वा कोणी, सारे जगविशिही तूच ।
विसर जाहला तुझा पुरा, सावध नव्हतो आम्ही जरा ॥
दूषित केले तुझ्या घरा, कर्ते बनलो भराभरा ॥१॥
वायु शुद्ध नाही, आता पीकपाणि नाही ।
अतीवृष्टि कोठे, येथे मेघवृष्टि नाही ।
वृक्ष,वेलि,पाने,पेरे मरगळले पाही ।
आकाशी डोळे, आलो तुझ्या द्वारि पाही ।
चूक सुधारू स्मरू खरा, जीवनदायी तुझा झरा ।
अजाण आम्ही क्षमा करा, पाण्याचा वर्षाव करा ॥२॥
विश्वंभरा, जगदीश्वरा, दासांवरती करुणा करा ॥
विश्वंभरा, जगदीश्वरा, सृष्टिचक्र अनुकूल करा ॥
