रचना क्र. 12
नरदेहा येऊनी स्वहित करावे
श्री कृष्णदास महाराज
नरदेहा येऊनी स्वहित करावे ।
स्वानंदी भरावे मानवा रे ॥धृ॥
मानवा श्रवणी पाडी श्रीगुरुवाणी ।
तेणे सोडवणी होय तुझी ॥१॥
होय तुझी तुला सहजची प्राप्ती ।
मग भवभीती मुळी नाही ॥२॥
मुळी नाही देव सद्गुरुवाचोनी ।
पाहोनी धोंडा पाणी हित काय ॥३॥
हित काय करी स्वप्नीचे वैभव ।
सुख दु:ख भाव सारिखेचि ॥४॥
सारिखेचि भाव जागृति झालीया ।
म्हणुनि गुरुराया शरण जावे ॥५॥
शरण जावे भावे मीपण त्यागावे ।
प्रारब्ध भोगावे सहजचि ॥६॥
सहजचि नाम मनी ध्याता गाता ।
निज ध्यास होता मन राम ॥७॥
मन राम झाले देहा विसंबले ।
कृष्णदासा आले निजभाग्य ॥८॥
