रचना क्र. 249
रे धाव आता पंढरिनाथा
श्री पेठेकाका · null
null
रे धाव आता पंढरिनाथा । पाऊल अडले घरी ।
रे देवा माझे । पाऊल अडले घरी ॥धृ॥
कळस तुझा दिसतो घरट्यातुन ।
हाक आर्त येते हृदयातुन ।
परि मायेचा उंबरा ओलांडे ना मज ।
हात जरा देवा धरी ...॥१॥ रे देवा माझे ...
मुले, बाळे, घर, पैसा, नाती ।
जन्मभरी मी जपली किति ती ।
परि साऱ्यांचे करुनी, नावे ठेविती बघ ।
हलकेच सुटणुक करी ... ॥२॥ रे देवा माझे ...
वाचन, गायन, मतप्रतिपादन ।
पांडित्याने आनंदे मन ।
शब्दज्ञानच चरणी येण्या अडविते दीना ।
कान प्रेमाने धरी ...॥३॥ रे देवा माझे ...
