रचना क्र. 244
जय जयाजी रामराया करि कृपेची छाया
श्री निरंजन रघुनाथ · null
null
जय जयाजी रामराया करि कृपेची छाया ।
पंचारती ओवाळूनि करू कुरवंडी पाया ॥धृ॥
ब्रह्मयाच्या वरदाने दैत्यरावणकुंभकर्ण ।
अजिंक्य होऊनिया देव पीडिले संपूर्ण ।
सज्जनांसी भय झाले करि कोण संरक्षण ।
दितीकूळ तृप्त झाले भक्षुनीया ऋषीगण ॥१॥
भूभार हरावया रघुकुळी अवतार ।
कौसल्येेचे ठाई जाले परब्रह्म साकार ।
दाशरथी रामचंद्र मूर्ति सावळी सुंदर ।
देव पुष्पवृष्टि करिती अयोध्येसी जयजयकार ॥२॥
शेष सेवा करावया जाला बंधू लक्षुमण ।
ताटिकेसी मारियेले केले मखाचे रक्षण ।
शिवचाप भंगोनीया वरिली सीता सुलक्षण ।
भार्गवाचा गर्व हरिला येता अयोध्येलागून ॥३॥
पितृआज्ञे वनवास देवकार्यार्थ केला ।
सुग्रिवादि वानरांचा समुदाय मेळविला ।
पाण्यावरि दगडाचा दृढ सेतू बांधियेला ।
रावणाते दंडुनीया सीताशोक निवारीला ॥४॥
पुष्पक विमानात सितारामलक्षुमण ।
नळनीळ जांबुवंत सुग्रिव भक्त हनुमान ।
अयोध्येसि येते जाले भरतासि संबोधून ।
रघुराज गुरुपायी ठेवि मस्तक निरंजन ॥५॥
