रचना क्र. 217
माझ्या देवाने मला फसविले
श्री पेठेकाका · null
null
माझ्या देवाने मला फसविले
सारे सांभाळितो म्हणुनिया घालविले
हो, माझ्या देवाने मला फसविले ॥धृ॥
हवे मला जे दिसे सुचे ते
‘मी असता तुज कमी कशाते !’
मला देता देता हवेपण घालविले ।
हो, माझ्या देवाने मला फसविले ॥१॥
म्हणे ‘घराचे करि मी रक्षण
चीजवस्तुही मी सांभाळिन !’
मला आनंदात ठेवुनिया लुटविले ।
हो, माझ्या देवाने मला फसविले ॥२॥
चिंता चिंतन मज गोडीची
म्हणे ‘मला दे ओझी माझी !’
ओझे घेउनिया डोळ्यांपुढे जाळियेले ।
हो, माझ्या देवाने मला फसविले ॥३॥
वाटे मजला भय मरणाचे
‘मी असता तुज भय न कशाचे !’
दीना जितेपणी मारुनिया तारियेले ।
हो, माझ्या देवाने मला फसविले ॥४॥
