रचना क्र. 201
अन्नाच्या परिमळे
श्री तुकोबा
अन्नाच्या परिमळे जरि जाय भूक ।
तरी का पाक घरोघरी ॥धृ॥
आपुलाले तुम्ही करा रे स्वहित ।
वाचे स्मरा नित्य रामराम ॥१॥
देखोनि जीवन जरि जाय तान ।
तरी का हे साठवण घरोघरी ॥२॥
देखोनिया छाया सुख न पविजे ।
जव न बैसिजे तया तळी ॥३॥
हित तरी होय गाता आईकता ।
जरि राहे चित्ता दृढ भाव ॥४॥
तुका म्हणे होसी भावेचि तू मुक्त।
काय करिसी युक्त जाणिवेची॥५॥
