रचना क्र. 7
कठीण रे बाबा कठीण
श्री पेठेकाका
कठीण रे बाबा कठीण । कठीण रे बाबा कठीण ।
कठीण कठीण कठीण । कठीण रे बाबा कठीण ॥धृ॥
बिऱ्हाड बदलणे सोपे आणिक
घरे बांधणे सोपे
मजल्यावरती मजले वेळी
तेही उठवणे सोपे..
पण
आपल्या घरात आपण असून
पाहुण्यासारखे राहणे.. ॥१॥
शिक्षण अर्थार्जन सोपे अन्
लग्न प्रपंचही सोपे
समाजकार्ये युद्धे वेळी
शोध पराक्रम सोपे..
पण
सारे काही करणे, त्यात
कुठे न गुंतुन राहणे.. ॥२॥
संत गाठणे सोपे त्यांचे
ग्रंथ समजणे सोपे
उपदेशाचा अर्थ लावणे
विवरण करणे सोपे..
पण
श्रद्धा टिकून राहणे,
संत सांगतात तसे वागणे.. ॥३॥
नाम किती हे सोपे आणिक
स्मरण किती हे सोपे
कसले कठीण वाटे तुम्हा
क्षुल्लक सारे सोपे..
पण
दीन म्हणे रे बोलणे सोपे,
करणाऱ्याला कठीण.. ॥४॥
