रचना क्र. 64
अजब ही परमार्थाची तऱ्हा
श्री पेठेकाका · null
null
अजब ही परमार्थाची तऱ्हा
आमुच्या परमार्थाची तऱ्हा,
अजब ही परमार्थाची तऱ्हा ॥धृ॥
अपुरे पडता घर वाढवितो ।
सुखसोयींनी सदा सजवितो ।
परि घराचा मालक वाटे, कोनाड्यात बरा ! ॥१॥
देव मानतो, जगी सांगतो ।
जनी जनार्दन, सदा घोकतो ।
मनासारखा वागे माणुस, वाटे तोच खरा ! ॥२॥
भाव पाहिजे भक्तीसाठी ।
उपचारांची न लगे दाटी ।
भव्यदिव्य पूजा कुठे पाहता, हेवा आणी घरा ! ॥३॥
आपुल्यापाशी सारे दडले ।
मर्म हुडकण्या जिणे लाभले ।
उठाठेवि करी उगा जगाच्या, दीना सावध करा ! ॥४॥
