रचना क्र. 5
तिसऱ्या व अंतिम दिवसाचे प्रार्थनामंत्र
श्री पेठेकाका
(भूमिका ऐकून व वाचून झाल्यानंतर उपस्थितमंडळींनी खालील प्रार्थनामंत्र सामुदायिकपणे म्हणावेत.गतव्यक्तीविषयीचे गुणस्मरण करावे.शेवटी कृतज्ञतेची तुळशीफुले वाहावीत.)
॥श्रीराम॥
॥ सब संतन की जय ॥
आत्मस्वरूप परमात्मन्, हे प्रभो, सृष्टिचालका ।
प्रार्थनापुष्पांस स्वीकारी, हे सद्बुद्धिप्रदायका ॥१॥
अवघ्या जगावरी माया, दया सर्वांवरी असे ।
जडावरी जसे प्रेम, चेतनविश्वावरी तसे ॥२॥
मनुष्यजन्म हा लाभे, त्याला ना तुलना असे ।
पुण्ये ना जाणतो अमुची, कर्तृत्व अमुचे नसे ॥३॥
भाग्याने देह हा लाभे, तीही केवळ तुझी कृपा ।
स्मरण घडणे कृपेचेही, आज आहे नवी कृपा ॥४॥
आकार देउनी आम्हा, धाडिता जन्म लाभला ।
जगती उचित ते पूर्ण, करण्या देह हा दिला ॥५॥
जाणून जगण्यासाठी, सावधान करी सदा ।
कालौघात स्वरूपाचे, भान राहोत सर्वदा ॥६॥
समान सम आनंदी, असता आम्ही सर्वही ।
विसरून तुला भगवन्, आणिले विविध स्वार्थही ॥७॥
भेदाने नटविली सृष्टी, तुझे ते बाह्य वैभव ।
निर्मिता अंतरी भेद, चुकतो आम्ही मानव ॥८॥
याची जाणीव देऊनी, भाग्याची कल्पना दिली ।
आचारधर्म शोधूनी, संतांनी प्रेरणा दिली ॥९॥
मानवी जन्म ही संधी, तसे पुढती कळे असे ।
देहाने व्यक्त जो होई, तोच अव्यक्त होतसे ॥१०॥
जन्माचे वेगळे सुख ना, मृत्यूचे दुःख ना असे ।
शुभाशुभ पुन्हा भेद, मानवी बुद्धिचा असे ॥११॥
जन्माने विसरतो देव, तो जन्म शुभ कोठला ।
मृत्यूने आठवे देव, पाहिजे शुभ मानला ॥१२॥
खरे तर असे भेद, कल्पना तर्क आणती।
आधी आहे, पुढे आहे,सच्चिदानंद ही स्थिती ॥१३॥
देहाची आकृती आणि, वासनादेह सोबत ।
हलके करणे चित्त, इतुके जीवनामृत ॥१४॥
आम्ही तुझ्यामध्ये होतो, येण्यापूर्वी जगात या ।
चैतन्ये आत वावरशी, असता आम्ही जगात या ॥१५॥
तसे आम्ही तुझ्यामध्ये, जाऊ विलय पावुनी ।
पुन्हा राहू तुझ्यामध्ये, सच्चिदानंद होउनी ॥१६॥
आम्ही जे आप्तसंबंधी, मित्रवर्ग, हितेच्छुही ।
घडले ज्यांस देहांतर, त्यांचे कृतज्ञ सर्वही ॥१७॥
निराकार परमात्मन्, मुक्त हा जीव परतला ।
एकत्वे पूर्ववत् नांदो, ‘तेथे’हा जीव ‘तेथला’॥१८॥
पृथ्वीचे मृत्तिका भस्म, करूया परत ते तिला ।
स्नेह, अक्षत राहू दे, भाव जल फुलातला ॥१९॥
॥ ॐ शांतिः शांतिः शांतिः ॥
