रचना क्र. 1
कृतज्ञतामार्गाची भूमिका
श्री पेठेकाका
(या विधींमागील भूमिका भाग -१ : ध्वनिमुद्रित स्वरूपात लावावी किंवा जबाबदार व्यक्तीनं भूमिका वाचून दाखवावी.)
सर्व उपस्थितांना सादर नमस्कार !
अग्निसंस्काराचे मराठी मंत्र म्हणण्यापूर्वी या ‘कृतज्ञतामार्गा’च्या तीन दिवसांच्या विधींची व्यवस्था आपण समजून घेऊ. कृतज्ञतामार्ग हा केवळ अशा विधींपुरता मर्यादित नाही. म्हणून ‘कृतज्ञते’च्या सद्गुणाची गरज आणि जोपासना यांसाठी जिज्ञासूंनी मूळ मार्ग ‘कृतज्ञतामार्ग’ या सविस्तर पुस्तकातून जाणून घेण्याची कृपा करावी, ही विनंती.
आता आपण या मार्गाची प्राथमिक भूमिका थोडक्यात श्रवण करूया.
नुकताच देह ठेवून गेलेल्या आपल्यातल्या व्यक्तीला अंतिम निरोप देण्यासाठी, आवर्जून आलेल्या सर्व मंडळींना कृतज्ञतापूर्वक अभिवादन! गतव्यक्तीशी कुणाचे कुटुंबीय म्हणून तर,कुणाचे आप्त, मित्र,व्यवसायबंधू, शेजारीपाजारी, शिक्षक, विद्यार्थी, गुरू, शिष्यवर्ग, सामाजिक कार्यकर्ते - अशा अनेक प्रकारांनी या व्यक्तीच्या आयुष्यात संबंध आले असतील. देहात असताना आलेल्या या संबंधांचं स्मरण ठेवून, या आदरणीय गतव्यक्तीला,त्याच्या देहाला, आदर्श अशा अग्निसंस्कारानं निरोप देताना, आपण आपल्या संबंधांचं स्मरण तर करीत आहोतच पण, त्या व्यक्तीचं ॠण फेडण्याचं एक सत्कर्मही आचरीत आहोत.
हा निरोप देण्याच्या प्रसंगात, वैयक्तिकदृष्ट्या वियोगाचं दुःख असणं हे स्वाभाविक आहे. पण, हे आपण समजून घेऊया की, आत्ता आपण ज्या पद्धतीनं तो निरोप देत आहोत, त्यावर पारंपरिक अशुभाचं सावट मात्र नाही ! निसर्गाकडून किंवा निर्गुुण ईश्वराकडून,प्रत्येकाला एका शुभ मुहूर्तावर देहानं आकाराला येण्याची संधी एकेकाळी मिळाली. जन्मभर, आपापली प्रारब्धं, कर्मस्वातंत्र्याप्रमाणं कर्मं करण्याची आणि ईश्वरानं योजलेल्या वेळी जन्माची सांगता करण्याची मिळालेली संधी, हीसुद्धा तशीच शुभ होय. त्यामुळंच या ठिकाणी येतानाआणि या भूमिकेनंतरही भगवंताचं पवित्र नाम आपण घेत आहोत. प्रत्यक्ष अग्नी देतानाही या रामाच्या किंवा अन्य नामाचं वैखरीनं स्मरण करीत, देहाची आहुती नामानं आपण देत आहोत.
पूर्वीपासून यासाठी निर्माण झालेल्या आचारांमध्ये, मृत्यू अशुभ समजून अंंत्यविधीपासून दिवसकार्य, तिलतर्पण, पिंडदान, वर्षश्राद्ध किंवा त्यानंतरही येणारी श्राद्धकर्मं सांगितलेली आहेत. त्यामागं गतव्यक्ती त्याच्या पूर्वजांच्या स्थानी जाऊन, केलेल्या कर्मांचे परिणाम सोसून, पुन्हा देहात येण्याची इच्छा गृहीत धरलेली असते.
त्याचबरोबर मृत्यू अशुभ मानल्यामुळं, या कर्मांबरोबर एक प्रकारचं भयही वावरत असतं. आपल्याकडं प्रचलित असलेल्या मुख्य दोन मार्गांपैकी, हा पितृमार्ग - पितृयानमार्ग होय.
त्यात याला पूरक अशी कर्मकांडं वाढत जाणं, केल्या जात असलेल्या - कर्मांचा संस्कृत मंत्रांचा अर्थ न कळणं, व्यावसायिकता येणं, अशा विधींना अनावश्यकपणे अनेक दिवस लागणं, कालानुरूप दोषशोधन न होणं, झाल्यास ते न स्वीकारलं जाणं, जन्माच्या सांगतेचं पवित्रपण- शुभमयता, मंगलमयता मृत्यूला असताना, अशा विधींवर अशुभाचं अकारण सावट येणं- अशा अनेक कारणांनी या मार्गातली कर्मं हळूहळू अंतरत चालली आहेत. काहीवेळा, ती समाजाच्या दडपणाखाली किंवा प्रतिष्ठेचा भाग म्हणून करण्याचाही कल दिसतो.तसंच भयानंही करण्याचा कल दिसतो.
म्हणून, यात वेदकालापासून आजकालच्या शुद्ध, सात्त्विक मार्ग चालणाऱ्या संतांपर्यंत सर्वांनी, दुसरा देवयानमार्ग, कालानुरूप शुद्ध करीत आणलेला आहे. तो सर्वांना आचरण्यासारखा, समान, पटणारा, बदलक्षम आणि सुटसुटीत आहे.त्यामागं आपल्याला सृष्टीतला सर्वोत्तम असलेला नरदेह देणाऱ्या निसर्गाविषयी, आपापल्या उपास्य दैवताविषयी कृतज्ञता बाळगून, श्री ज्ञानेश्वर माउलींनी म्हटल्याप्रमाणं,पुन्हा या ‘देहाच्या कैदेत’ पडायला लागणार नाही, अशी कर्तव्यं आणि उपासना करून, देहात असताना किंवा देह पडताना आनंदानं, कृतज्ञतेनं आपापल्या दैवतांशी एकरूप होण्यावर देवयानमार्गाचा भर आहे.
अशा अर्थानं जगायचं झालं तर, निसर्ग, व्यक्ती, समाज, संस्था, आपल्याला जगायला मदत करणाऱ्या अनेक यंत्रणा - यांचे उपकार लक्षात ठेवून, त्यांचं उतराई होण्यासाठी अंतिम क्षणापर्यंत कार्यरत राहण्यानं, कालानुरूप येणारा मृत्यू ही जीवनाची सार्थकता आणि शुभसांगता ठरते. अशा तर्हेचं कृतज्ञतेनं जगलेलं जीवन, भक्तिप्रधान वाटचाल ही व्यक्तीच्याच नव्हे तर, समाजाच्या, निसर्गाच्या व्यवहारालाही औचित्याची आणि स्वास्थ्याची आहे, हे कुणालाही पटण्यासारखं आहे.
त्यातहीदेवयानमार्गातल्या देवदेवतांना आकाराला आणणाऱ्या मूळ, निर्गुण, अनाम ईश्वरी शक्तीकडं थेट जाण्याची पवित्र इच्छा धरणं, हे देवयानमार्गाचं तर्कशुद्ध, प्रगत स्वरूप होय. त्या अर्थानं, असं जीवन जगणं म्हणजे,‘सगुणाचेनि आधारे, निर्गुण पाविजे निर्धारे’ किंवा ‘पुनरपि संसारा येणे नाही’ अशा संतवचनांचं आदर्श प्रात्यक्षिकच होय ! या मार्गाचा खुलासा संबंधित पुस्तकात आपण नंतर अवश्य वाचावा. मानवी जीवन हे खऱ्या अर्थानं माणुसकीचं घडतं,ते सद्गुणांच्या जोपासनेमुळं. त्यात कृतज्ञता हा अगदी प्राथमिक पण महत्त्वाचा,मन सुसंस्कृत करणारा केंद्रबिंदू होय. माणसाला मुक्त करणाऱ्या आणि समाजजीवनाला विधायक मदत करणाऱ्या, या जीवनपद्धतीलात्यामुळंच ‘कृतज्ञतामार्ग’ असं म्हटलं आहे.तो जसा जीवनभर चालण्याचा मार्ग आहे, तसा जीवनाच्या शेवटीही, जीवनाच्या संधीबद्दल देवाचं नाम घेऊन कृतज्ञ राहण्याचाही आहे. या गतव्यक्तीला, नामात अग्नीच्या स्वाधीन करणं, ही कृतीही इतर कसलीही कर्मकांडं टाळून, इतरांनी करण्याची कृतज्ञतेची कृतीच आहे.
या दोन्ही मार्गांतला मूळ कृतज्ञतेचा गाभा कायम ठेवून स्वीकारलेला हा अधिक शुद्ध, देवयानमार्ग - कृतज्ञतामार्ग आहे. संपर्कमाध्यमांची सहज उपलब्धता, नवी कार्यक्षेत्रं, बदलती जीवनपद्धती यांमुळं माणसाला असलेला वेळेचा अभाव - अशा अनेक गोष्टी लक्षात घेऊन, या कृतज्ञतामार्गात गरजेच्या अशा तीन दिवसांच्या विधींचीच योजना केली आहे.त्यामुळं यानंतर उद्याचा दिवस हा भेटीगाठी तसंच हा मार्ग अधिक समजून घेण्यासाठी संबंधित पुस्तकाचं वाचन, यांसाठी आहे. तर, नंतरच्या तिसऱ्या दिवशी रक्षापूजनाची भूमिका, त्यासाठी मराठी मंत्र, प्रत्यक्ष पूजन आणि त्यानंतर प्रसाद होऊन, हा तीन दिवसांचा शुभविधी समाप्त होईल.
पुढं तिथीप्रमाणं वार्षिक कृतज्ञता विधी वैयक्तिक असेल आणिसर्वपित्री अमावस्येच्या दिवशी सार्वत्रिक वार्षिक कृतज्ञता विधी यांचीही योजना आहे. असा सार्वत्रिक वार्षिक कृतज्ञता विधी वैयक्तिकरित्या ही करता येतो. या विधींनाही, या संबंधी जिज्ञासा असलेल्या, सश्रद्ध मंडळींनी यावं व सहकार्य करावं, ही कुटुंबियांच्या वतीनं सर्वांना विनंती !
यानंतर अग्नी देण्यापूर्वी ध्वनिमुद्रित मराठी मंत्र लावले जातील. त्यात सर्व स्त्रिया-पुरुष-मुलं सहभागी होऊ शकतात. ‘नाम्ना साद्गुण्यम्’अर्थात कुठल्याही कर्मात राहणारी उणीव, भगवंताच्या नामानं पूर्ण होते, या भावनेनं रामनामात किंवा अन्य नामात गतव्यक्तीला आता आदरपूर्वक अग्नी दिला जाईल !
