रचना क्र. 29
दुर्लभ नरदेह झाला तुम्हा आम्हा
श्री नामदेव महाराज · null
null
दुर्लभ नरदेह झाला तुम्हा आम्हा ।
येथे साधू प्रेमा राघोबाचा ॥१॥
अवघे हातोहाती तरो भवसिंधु ।
आवडी गोविंदु गाऊ गीती ॥२॥
हिताचिया गोष्टी सांगू एकमेका ।
शोक मोह दु:खा निरसू तेणे ॥३॥
एकमेका करू सदा सावधान ।
नामी अनुसंधान तुटो नेदू ॥४॥
घेऊ सर्वभावे रामनाम दीक्षा ।
विश्वासे सकळिका हेचि सांगो ॥५॥
नामा म्हणे शरण रिघो पंढरीनाथा ।
नुपेक्षी सर्वथा दीनबंधु ॥६॥
