रचना क्र. 6
सामुदायिक वार्षिक कृतज्ञता दिवस - सर्वपित्री अमावस्या भूमिका
श्री पेठेकाका · null
null
सामुदायिक वार्षिक कृतज्ञता दिवस - सर्वपित्री अमावस्या भूमिका
‘कृतज्ञता हा मन सुसंस्कृत करणारा भारतीय संस्कृतीतला एक केंद्रबिंदू आहे. त्यानं मनुष्याचं व्यक्तिजीवन उत्तम घडून उद्धार होतोच, पण अशा सुसंस्कारित मनानं मनुष्य समाजस्वास्थ्यासाठीसुद्धा उपयुक्त बनतो. कृतज्ञतेचा आचार अर्थातच आजीवन चालणारी गोष्ट आहे. धर्मविचारामध्ये, विविध कृत्यांमध्ये गतपूर्वजांचं कृतज्ञतेनं स्मरण करण्यासाठी तिलतर्पण,पिंडदान, भोजन, दक्षिणा-अशी कर्मं सांगितली आहेत.त्यात कर्मकांडं वाढत गेल्यामुळं आणि कालानुरूप दोषशोधन न झाल्यामुळं, ही कर्मं हळूहळू अंतरत चालली आहेत. त्याचा परिणाम समाजावर दिसतोआहे.
वास्तविक व्यक्ती असताना दसरा, पाडवा किंवा त्या व्यक्तीचा वाढदिवस अशा एखाद्या शुभदिनी प्रत्यक्ष कृतींनी, वस्तूंनी ही कृतज्ञता व्यक्त करणं, हे अधिक मोलाचं आणि बदलत्या काळालाही पटणारंआहे. पण मृत्यूनंतरच्या या कृत्यांवर भर दिल्यामुळं,इकडं झालेलं दुर्लक्ष कमी करून, आता कालोचित बदल करण्याची गरज निर्माण झाली आहे. या कर्मांवर पूर्वापार चालत आलेलं अशुभाचं सावटही दूर करण्याची गरज निर्माण झाली आहे. व्यक्ती देहात असताना प्रकट केलेली कृतज्ञता उत्तम आणि शुभ आहेच,तितकीच ती नंतर स्मरणात ठेवणं,त्यासाठी प्रतीकात्मक कृती करणं आणि त्यातही गत व्यक्तीच्या गुणांचं स्मरण करणं, आचरण करणं हेही शुभच आहे.
त्यासाठी प्रथम संबंधित व्यक्ती हयात असताना या कृतज्ञतेची अभिव्यक्ती करणं, हे प्रधानकर्म संतनगरीत व्यक्तिशः केलं जातं. त्याशिवाय वर्षातून एखाद्या दिवशी उदा.पारंपरिक पितृपक्षातल्या अमावस्येला गत पूर्वज-आप्तसंबंधी आणि संतमंडळी यांचं कृतज्ञतापूर्वक प्रतीकात्मक अर्घ्यदानानं सामूहिकस्मरण केलं जातं.
कृतज्ञता बाळगणं, त्याची जाणीव ठेवून कृती करणं, अशा व्यक्तींबद्दल श्रद्धा बाळगणं- हे सर्व देहात असलेल्या मातापिता, संबंधी, संत इत्यादींच्या बाबतीत आपापल्या इच्छेनुसार करणं सर्वांनाच शक्यआहे. पण अशा कुणी व्यक्ती हयात नसतील, तरत्यांच्या बाबतीत कृतज्ञतेची अर्घ्यदानाची प्रतीकात्मक कृती करणं - त्यांच्याशी संबंधित असलेल्या आजच्या व्यक्तींना शक्य आहे. ते केल्यानंतर त्या व्यक्तीपासून मिळालेल्या आणि त्यांच्या त्यांच्या आयुष्यात उपयोगी पडलेल्या एखाद्या गुणाचं स्मरणही या उपक्रमात शेवटी केलं जातं. याशिवाय इथं ज्या संतांच्या छायेमध्ये सर्वच लहानथोर कुटुंबीय वावरत असतात, त्या आणि इतरही अव्यक्त संतमंडळींना आदरानं अर्घ्य देण्यात सर्वांना सहभागी होता येतं. संत एका अर्थानं देहात नसले आणि सूक्ष्म रूपानं विद्यमान राहून अनुभव देतअसले, तरी अशा प्रसंगी अशा मुक्तिदात्या संतांचंस्मरण सर्वजण कृतज्ञतेनं करतात.
माणसावर सुसंस्कार करणाऱ्या एका लुप्तप्राय होत चाललेल्या प्रथेचं हे कालोचित, उपयुक्त, व्यापकआणि मूळ हेतूचं भान जागवणारं पुनरुज्जीवन आहे !त्यासाठी हे नवे प्रतिसांवत्सरिक मराठी मंत्र !’
