रचना क्र. 5
उर्वरित पूजा आणि क्षमायाचना
श्री पेठेकाका · null
null
महाभिषेक स्वीकारा देवा सिद्धिविनायका ।
स्नानानंतर आचमन, फुलाने पाणि द्या जरा ॥
रक्तवस्त्रे दोन दिव्य अर्पितो श्री विनायका ।
सर्वप्रदा घेई ती, लंबोदर हरात्मजा ॥
ब्रह्मसूत्र सुवर्णाचे यज्ञोपवित आणिले ।
उत्तरीय म्हणुनी घ्यावे, भक्तांना वर द्या भला ॥
कस्तुरीयुक्त हे चंदन केशरहि त्यात घातले ।
विलेपना सुरश्रेष्ठा घ्यावे चंदन हे भले ॥
द्विरदानना गणेशा या, आणिल्या लाल अक्षता ।
भाळीच्या चंद्रम्यावरती धारण करण्या गजानना ॥
शेंदूर हळदीकुंकू बुक्का अत्तर भूषणे ।
फुले, कमळे, पत्री, केवडा, तुळस वाहणे ॥
गणाधिपा नमू तुजला, उमापुत्रघनाशना ।
एकदंता इभवक्त्राला, मूषकवाहना तसे ॥
विनायका, ईशपुत्रा, सर्वसिद्धिप्रदायका ।
कुमारगुरु हे तुजला, दूर्वा वहाण्यास आणिल्या ॥
स्वीकारा धूपदीपाला, कर्पूरार्ती पवित्र घ्या ।
दक्षिणा, विडा, सुपारीही, फळे नैवेद्य अर्पिला ॥
विघ्नेश्वर, विशालाक्षा, सर्वाभीष्टफलप्रदा ।
प्रदक्षिणा अर्पितो मी, शुभ इच्छा पुऱ्या करा ॥
घडली जन्मान्तरी पापे, या जन्मी मजकडून जी ।
प्रदक्षिणा करी नष्ट पावलापावलात ती ॥
म्हणुनी घालणे एक स्वत:भोवती प्रदक्षिणा ।
नमस्ते विघ्नहर्त्याला, नमस्ते ईप्सितप्रदा ॥
नमस्ते देवदेवेशा, नमस्ते गणनायका ।
साष्टांग घालणे नमन, ऐसे म्हणुन विनायका ॥
मंत्रपुष्प तसा म्हणणे, करणे अंति आरती ।
क्षमायाचना या पुढली, करावी हात जोडुनी ॥
आवाहन न जाणे मी न जाणे स्तवना तव ।
पूजा न जाणतो मी हे ईश्वरा करि क्षमा मज ॥
तुजवीण नसे त्राता, ईश्वरा शरण मी तुला ।
तरी कारुण्यभावाने, रक्षी मजसि ईश्वरा ॥
रात्रंदिन किती करितो अपराध सहस्र मी ।
जाणून मी तुझा दास, क्षमावे मज ईश्वरा ॥
मंत्रहीन, क्रियाहीन, भक्तिहीन, सुरेश्वरा ।
पूजेत जे जसे केले, पूर्णत्वा नेइ ईश्वरा ॥
गेले पाप तसे दु:ख, गेले दारिद्य्र सर्वही ।
आली ही सुखसंपत्ती, तुझिया पुण्यदर्शने ॥
ज्याच्या स्मरण-नामाने, पूजा-यज्ञ-क्रिया तशा ।
न्यून संपूर्ण होती त्या, अच्युता नमु आजला ॥
जसे ज्ञान जसे शक्य, केले उपचार पूजनी ।
सिद्धीविनायकाला ते, प्रिय होवोत सर्वही ॥
आता सांगता सिद्ध्यर्थ ब्राह्मणपूजना करू ।
वायनेदक्षिणा सोडू, मागू आशीर्वचा तया ॥
झाले पार्थिव गणेशाचे प्रतिवार्षिक पूजन ।
अर्पण असोत सद्ब्रह्मा, ते माझे कर्मही नसो ॥
॥ श्रीराम ॥ (तीन वेळा म्हणणे.)
आरती म्हणणे.
