उपासनामाला॥ श्री ॥
रचना क्र. 5
कृपाष्टक
❖
श्री पेठे काका
आला देह मनुष्याचा
लाभ पहिला जगी असे ।
जाणवे, कळता आता,
कृपा ही केवढी असे ! ।।१।।
दुसरे विचारसामर्थ्य,
कल्पनेचे किती तसे ।
जाणवे, कळता आता,
कृपा ही केवढी असे ! ।।२।।
तिसरे सामर्थ्य जे विविध
संबंधांतून येतसे ।
जाणवे, कळता आता,
कृपा ही केवढी असे ! ।।३।।
चौथे अन्न तसे पाणी
सृष्टी देई अपूर्वसे ।
जाणवे, कळता आता,
कृपा ही केवढी असे ! ।।४।।
पाचवी कर्मशक्ती जी
प्रवास घडवीतसे ।
जाणवे, कळता आता,
कृपा ही केवढी असे ! ।।५।।
सहावा ध्येयमूल्यांचा
सगुणी देव हा असे ।
जाणवे, कळता आता,
कृपा ही केवढी असे ! ।।६।।
सातवी ओळख देवाची
सर्वत्र भरला असे ।
जाणवे, कळता आता,
कृपा ही केवढी असे ! ।।७।।
आठवी सद्गुरुप्राप्ती,
नाम दिव्य मिळे तसे ।
जाणवे, कळता आता,
कृपा ही केवढी असे ! ।।८।।
श्री सद्गुरुनाथ महाराज की जय ।
❖