रचना क्र. 2
ऋणस्मरणमाला
श्री पेठेकाका
मातापिता स्वजन अन् परिवार सारा ।
ज्यांनी जिवास दिधला जगती निवारा ।
बुद्धी विचार स्वर अक्षर दिव्य धारा ।
राहो सदैव स्मरणी उपकार सारा ॥१॥
आजन्म साथ करुनी जगवी जनांस ।
देणे सदैव किति हे, अवघ्या जिवांस ।
त्या सृष्टिचे ऋण फिटे, कधि का कुणास ।
आहे सदैव स्मरणे, मज पामरास ॥२॥
हातात बोट धरुनी, अवघ्या गुरूंनी ।
विद्या असंख्य दिधल्या, जगण्यास ज्यांनी ।
नेले तरून मजला मम सद्गुरूंनी ।
कर्तव्य रोज घडु दे, सकळा स्मरूनी ॥३॥
ज्यांनी जगून जपले, जगि ईश्वरास ।
शास्त्रे असंख्य रचिली, जपले कलांस ।
मूल्ये अमूल्य दिधली जगण्या जगास ।
त्यांचे सदैव ऋण हे मज पामरास ॥४॥
शास्ते असोत जन वा कुणि राजसत्ता ।
संस्था कितीक जपती जगती व्यवस्था ।
त्याही पुढे असत जो अवघ्यांस त्राता ।
आहे हरेक स्मरणे उपकारकर्ता ॥५॥
आलो कशास जगती, जगणे कशास ।
कर्तव्य काय कुठले, कळु दे मनास ।
धैर्ये जगून मरणे, मिळणे प्रभूस ।
दीना सदैव धरणे, मनि हाच ध्यास ॥६॥
-- श्रीराम --
