रचना क्र. 3
विनवणीची वाणी
श्री पेठेकाका
-- १ --
माझी विनवणीची वाणी ।
तुम्ही ऐकावी सज्जनी ॥१॥
थोडे व्हावे कृपावंत ।
बाळवचनी देण्या चित्त ॥२॥
वय अनुभव थोर ।
श्रेष्ठ आपुला अधिकार ॥३॥
धन, मान अपुली सत्ता ।
मी तो कणही ना पुरता ॥४॥
दीन बोले तरि हे वचन ।
पटता मानावे प्रमाण ॥५॥
-- २ --
देह धरणे का हो लागे ।
काळ का लागे हो मागे ? ॥१॥
मायबाप नाही हाती ।
पराधीन अवघे होती ॥२॥
भेट, गाठ, स्थिती याला ।
जीव जन्माने बांधला ॥३॥
अवघ्या बंधांचे कारण ।
कोणी काढावे शोधून ॥४॥
दीन म्हणे हे ना करणे ।
पुन्हा जन्मा यावे त्याने ॥५॥
-- ३ --
ज्यांनी पोटास घालावे ।
त्यांचे दास लागे व्हावे ॥१॥
ज्यांनी दाखविली माया ।
त्यांना द्यावी लागे काया ॥२॥
कोणाचे ना काही घ्यावे ।
कैसे जीवन चालावे ? ॥३॥
देणे चुकवूनी जगावे ।
ओझे वाढते स्वभावे ॥४॥
दीन म्हणे काही करा ।
अपुली आपण सुटका करा ॥५॥
-- ४ --
ज्याला वाटे करीन कर्म ।
सांभाळीन अवघा धर्म ॥१॥
त्याला गाठी अहंकार ।
बांधणारा चोर थोर ॥२॥
समाजाची सेवा करता ।
मानउपेक्षा ये हाता ॥३॥
वाढवावे ना गणगोत ।
परके येतसे गळ्यात ॥४॥
दीन म्हणे मार्ग शोधा ।
ज्यात नाही कुठली बाधा ॥५॥
-- ५ --
जरी रहावे बेफिकिर ।
तरी वणवण ना चुकणार ॥१॥
जरी बेसावध व्हावे ।
नक्की लागे पुन्हा यावे ॥२॥
मौजे ल्यावे, खावे, प्यावे ।
देह थकता दीन व्हावे ॥३॥
पैसा, प्रतिष्ठा तोवर ।
पाहुण्यांची येरझार ॥४॥
दीन म्हणे दाणे नुरती ।
पहा उरती का सोबती ॥५॥
-- ६ --
कोणी करी ना विचार ।
कसा आलो येथवर ॥१॥
प्रारब्धाचे चाले खाते ।
अवघे जमती घेते-दाते ॥२॥
वाटे आपण करितो सारे ।
प्रसंग येता कळते खरे ॥३॥
म्हणुनी त्यात ना अडकावे ।
हिशेब पुरते होऊ द्यावे ॥४॥
दीन म्हणे आता शोधा ।
कधी थांबेल हा धंदा ॥५॥
-- ७ --
बाकी मागील चुकवावी ।
कोठे काही न ठेवावी ॥१॥
नव्या कर्तृत्वाचा भार ।
नका घेऊ अपुल्यावर ॥२॥
करो प्रारब्ध व्यवहार ।
उभे आपण दूरवर ॥३॥
त्याला सापडेल वर्म ।
कसे जगावे उत्तम ॥४॥
दीन म्हणे हलके करा ।
जुने सारे पूर्ण करा ॥५॥
-- ८ --
जरी देह प्रारब्धाचा ।
दास न लागे व्हावे त्याचा ॥१॥
देही मालक जागृत राहे ।
त्याला सोपे सारे आहे ॥२॥
मूळ चैतन्य तो प्राण ।
देही नांदे नारायण ॥३॥
त्याचे आपण कैसे व्हावे ।
तेच लागते जाणावे ॥४॥
दीन म्हणे त्याचे वर्म ।
संतवचनी होते काम ॥५॥
-- ९ --
संतांअंगी थोरपण ।
येत नाही अकारण ॥१॥
तेही देहात येतात ।
पुरी प्रारब्धे करतात ॥२॥
परी कालातीत होती ।
जना बोधूनीया रीती ॥३॥
नित्य सावध होती चित्ती ।
वरी योग्य कर्मे करिती ॥४॥
दीन म्हणे संतरीत ।
हाती येता सुटते गणित ॥५॥
-- १० --
म्हणुनी संतांचे महिमान ।
देव देती त्यांना मान ॥१॥
तेचि देव संस्थापिती ।
सगुण साक्षात करवीती ॥२॥
कसे कर्तव्य करावे ।
कसे अंतर बदलावे ॥३॥
काळावरती करिती मात ।
करिती प्रारब्धाचा अंत ॥४॥
दीन म्हणे जाणा त्वरे ।
संत करावे सोयरे ॥५॥
-- ११ --
सोपे नामाचे साधन ।
त्यांत कर्तव्यांचे भान ॥१॥
देह कारणी लावावे ।
सर्व संतांनी शिकवावे ॥२॥
स्वामी देहाचे होऊनी ।
व्हावे ज्ञानी वा विज्ञानी ॥३॥
संत फिरती अथवा बसती ।
हित जगाचे साधती ॥४॥
दीन म्हणे अवघ्या युक्ती ।
संतपायी शिकता येती ॥५॥
-- १२ --
काळ जातो जैसा पुढती ।
सुखसाधने वाढती ॥१॥
पैसाभोगांची ही भूल ।
दु:ख, अस्वास्थ्य देईल ॥२॥
कळे त्याने सावध व्हावे ।
मायाबाजार जोखावे ॥३॥
जगचालीने वर्तावे ।
स्थिर अंतरी असावे ॥४॥
दीन म्हणे संतां शरण ।
त्यास नाही जन्ममरण ॥५॥
-- १३ --
सोपी संतांची या रीत ।
नाम ठेवावे चित्तात ॥१॥
देह स्वधर्मी ठेवावा ।
लोकव्यवहार राखावा ॥२॥
योग्य ऐहिक सांभाळावे ।
बंधमुक्त तेणे व्हावे ॥३॥
जातपात नाही यात ।
एक सर्व या मार्गात ॥४॥
दीन म्हणे सोपे आहे ।
थोडे करूनिया पाहे ॥५॥
-- १४ --
अंती जोडूनीया हात ।
म्हणे व्हावे कृपावंत ॥१॥
थोर आपण लक्ष द्यावे ।
स्वहित आपुले साधावे ॥२॥
वाटे बुद्धीने चालावे ।
तरी अभ्यासे पहावे ॥३॥
जरी पाहाल अनुभव ।
मग ठेवाल ना भाव ॥४॥
दीन मागे देवा दान ।
व्हावे सर्वांचे कल्याण ॥५॥
॥ श्री संतचरणार्पणमस्तु ॥
॥ श्री लोकचरणार्पणमस्तु ॥
॥ श्री सच्चिदानंदार्पणमस्तु ॥
