रचना क्र. 136
मना नाम घे, मना नाम घे
श्री पेठेकाका · null
null
मना नाम घे, मना नाम घे, नकोच दुसरा छंद ! ॥धृ॥
देहसुखाला सदैव जपशी
स्वार्थ साधण्या तत्पर असशी
खरे सांग परि अशांत का तू, का न टिके आनंद ?
कधी न देतिल आनंद तुज हे अशाश्वताचे छंद ॥१॥
शिक्षण घेशी, घरे बांधिशी
नातीगोती किती जोडिशी
खरे सांग परि अशांत का तू, का न टिके आनंद ?
कधी न देतिल आनंद तुज हे अशाश्वताचे छंद ॥२॥
रात्रंदिन किती राबराबशी
पैसा वस्तू गोळा करिशी
खरे सांग परि अशांत का तू, का न टिके आनंद ?
कधी न देतिल आनंद तुज हे अशाश्वताचे छंद ॥३॥
किती साधने सुखे उशाशी
जगी पुरविशी साऱ्या हौशी
खरे सांग परि अशांत का तू, का न टिके आनंद ?
कधी न देतिल आनंद तुज हे अशाश्वताचे छंद ॥४॥
देवधर्म अन् समाजसेवा
कला संस्कृती तुझा विसावा
खरे सांग परि अशांत का तू, का न टिके आनंद ?
कधी न देतिल आनंद तुज हे अशाश्वताचे छंद ॥५॥
जगी जगापरि अवश्य राही
छंद करी तू खुशाल देही
परि जाण त्यातुनी न गवसे शाश्वतचा आनंद
मना शोध घे, मना बोध घे, नाम हा खरा छंद ! ॥६॥
नाम छंद भगवंत जोडतो
निरुपाधिक आनंद दावितो
दीन म्हणे तुज शांत करुनिया, अखंड दे आनंद
मना शोध घे, मना बोध घे, खरा एक हा छंद ! ॥७॥
मना नाम घे, मना नाम घे, नकोच दुसरा छंद !!
