रचना क्र. 1
बोधपाठ
श्री पेठेकाका
बोधपाठाचे हे सार ।
काही करूया विचार ॥
पाहू शोधूनी आपण ।
जोडेल का नारायण ॥धृ॥
-- १ --
आज जाहली सद्बुद्धी ।
ठेवू बाजूस उपाधी ॥१॥
थोडा चित्ती देऊ ठाव ।
स्मरण्या देवा तुमचे नाव ॥२॥
वेळ काढुनी विचारी ।
कोठे राहतोसी हरी ?॥३॥
संसाराच्या या सागरी ।
कोण राहे पैलतीरी ?॥४॥
दीन म्हणे राम राम ।
तुमचे कळो मज प्रेम !॥५॥
-- २ --
कोठे उजाडे दिवस ।
कशी सरती वर्षेमास ॥१॥
नसे दिशांचेही भान ।
नसे सूर्याचे दर्शन ॥२॥
कधी चुकून पाहावे ।
आम्हा नभ वाटे नवे ॥३॥
रोज असते का ते तेथे ।
एक विचारी दुज्याते ॥४॥
दीन म्हणे रे माधवा ।
तैसे झाले जिवाशिवा ॥५॥
-- ३ --
पोटासाठी करिता कष्ट ।
झालो देहासी एकनिष्ठ ॥१॥
तुम्ही दिले पोट थोडे ।
आम्ही प्रगती केली पुढे ॥२॥
अन्नपाण्याने भरेना ।
तृप्ती कशाने घडेना ॥३॥
वस्त्रे सोने वस्तू नाना ।
हाव पैशाने पुरवेना ॥४॥
दीन म्हणे केशवासी ।
तुझी हाव नाही त्यासी ॥५॥
-- ४ --
मिळे संस्कार आंदण ।
त्याचे आम्हा नाही भान ॥१॥
रोज दिव्यातली ज्योत ।
होती देव प्रकाशित ॥२॥
सृष्टी जशी माझ्यासाठी ।
मीही होतो सृष्टीसाठी ॥३॥
आता शिकतो ग्रंथात ।
नाते माझ्या जे रक्तात ॥४॥
दीन म्हणे रामराया ।
दावा अभाग्यासी दया ॥५॥
-- ५ --
ज्यांचे स्वार्थाचे पाहाणे ।
जगी ठरती ते शहाणे ॥१॥
सदा जवळ पाहून ।
गेली दृष्टी मंदावून ॥२॥
आता स्वार्थ अपरिमित ।
एक जीव दुज्या भीत ॥३॥
जगणे हवे आनंदाचे ।
दृष्टी पाहू दे दूरचे ॥४॥
दीन म्हणे रे गोविंदा ।
थोड्या दावी परमानंदा ॥५॥
-- ६ --
किती वाटे प्रपंचात ।
मी तो वेगळा जगात ॥१॥
माझे गर्वाचे घरकुल ।
जो तो आधी ते पाहील ॥२॥
येता जाता तो म्हणेल ।
असे कोठेही नसेल ॥३॥
धूळकणांची मोजणी ।
विश्वी करील का कोणी ?॥४॥
दीन म्हणे रे विठ्ठला ।
माझी ओळख द्यावी मला ॥५॥
-- ७ --
निरंतर तुझिया श्रवणा ।
खंड न व्हावा दर्शना ॥१॥
हृदयी साठण्या चिंतन ।
डोळे कान दिले दोन ॥२॥
देण्यामागे तुझा भाव ।
कधी जाणे दुबळा जीव ?॥३॥
देव सोडी, जग पाही ।
त्याला अपुरे आयुष्यही !॥४॥
दीन म्हणे सावध होई ।
दिले त्यास ऐके पाही !॥५॥
-- ८ --
नयनश्रवण दोन दोन ।
जीभ एक केली दान ॥१॥
तिला कामेही अनेक ।
त्यांत वाचेचे हे एक ॥२॥
निंदादंभ आत्मस्तुती ।
खर्ची वाचेची संपत्ती ॥३॥
देवा प्रपंचे भक्षिली ।
तुझ्या वाट्या नाही आली !॥४॥
दीन म्हणे रे मुकुंदा ।
कशी लागे तुझिया छंदा ?॥५॥
-- ९ --
जग ठासून भरलेले ।
म्हणती नाही कुणी केले ॥१॥
आम्हा कळेना जे काही ।
वाटे जगती कोठे नाही ॥२॥
जगी कर्म कण नाही ।
ज्याचा कर्ता ना कुणीही ॥३॥
मुके वासरू जाणते ।
आई आई हंबरते ॥४॥
दीन म्हणे पंढरिराया ।
येवो विज्ञानाची दया ॥५॥
-- १० --
थेंब सागरा मोजितो ।
गणिते कसलीशी मांडितो ॥१॥
अपुले अंतर ज्या समजेना ।
ज्ञानमर्यादा जाणीना ॥२॥
घेतो अनंताचे माप ।
देतो निष्कर्ष नि:शंक ॥३॥
माझ्या मापात बसेना ।
देव कोठेही असेना !॥४॥
दीन म्हणे बा विठ्ठला ।
बुद्धी जाणो हा गलबला !॥५॥
-- ११ --
माझ्या कर्तृत्वाची पाटी ।
मीच लावितो शेवटी ॥१॥
कधी तीही वाट न पाहे ।
डंका आधी देत आहे ॥२॥
जीव आकाश धरणी ।
करता येईना मोजणी ॥३॥
वाटे इतके जो करील ।
कशी पाटी न लावील ?॥४॥
दीन म्हणे दयाघना ।
कसे कळावे या मना ?॥५॥
-- १२ --
विश्वाकार अवघी कला ।
देशी थाटून सकळा !॥१॥
अवघे चालण्याचा भार ।
प्रतिक्षणी तुझ्यावर ॥२॥
निरहंकाराचा आदर्श ।
तुझा जाणवतो थोड्यांस ॥३॥
देव नाही म्हणती काही ।
येरा जाणीवचि नाही !॥४॥
दीन म्हणे विश्वंभरा ।
हाती मज दृढ धरा !॥५॥
-- १३ --
जे जे नाही म्हणती देव ।
त्यांचा एक बरा भाव ॥१॥
देव नोकर त्यांचा नाही ।
करण्या प्रपंचाचे काही ॥२॥
ढोंग टळे भक्तीमधले ।
अंधश्रद्धा भ्रमही गेले ॥३॥
तयार शेत विवेकाचे ।
फक्त काय पेरायाचे ?॥४॥
दीन म्हणे रे दातारा ।
यांना द्यावा पेरा खरा ॥५॥
--१४ --
शब्दज्ञानी, व्यवहारी ।
तुम्हा मांडिती बाजारी ॥१॥
भयापोटी कोणी भजती ।
कुणा देखाव्याची प्रीती ॥२॥
घंटा झांजा आरती टाळ ।
अगम्य घालावा गोंधळ ॥३॥
कोण कोणा म्हणे काय ।
न कळे अर्थ काय होय ॥४॥
दीन म्हणे परमानंदा ।
तुमच्या नावे तरतो धंदा ॥५॥
-- १५ --
बहुत लोक हे मध्यम ।
त्यांना वाटे सोपे काम ॥१॥
सदा वाण सावधतेची ।
शक्तीबुद्धीही बेताची ॥२॥
इंद्रियांचा कारभार ।
देहबुद्धीचाही जोर ॥३॥
परी संख्येने हे थोर ।
म्हणुनी अंकित सावचोर ॥४॥
दीन म्हणे रे कृपाळा ।
लागो यांना तुमचा लळा ॥५॥
-- १६ --
सुखसोय विज्ञानाची ।
चुके वाट विवेकाची ॥१॥
सुख आधी देई हाती ।
आता नको तेही माथी ॥२॥
सृष्टीचक्रे बिघडवीती ।
वरी उपाय शोधीती !॥३॥
पूर्वी रोगे देह जाई ।
आता मदत औषध देई !॥४॥
दीन म्हणे हीच दया ।
जन्म मृत्यू हाती तुझिया !॥५॥
-- १७ --
पैसा मानवाचा दास ।
आता मुकुट मस्तकास ॥१॥
पैसा फेकतो तयास ।
देह देती रात्रंदिवस ॥२॥
जुळतीतुटती नातीगोती ।
अवघे पैशाने मोजती ॥३॥
निर्धनाचे कुणी नाही ।
एक देवाविना पाही ॥४॥
दीन म्हणे सर्वात्मका ।
दर्शनाही आता पैका ॥५॥
-- १८ --
लोक राहाती निश्चिंत ।
प्रपंचाच्या या आगीत ॥१॥
रोग, वेग कमी पडती ।
लोभ, व्यसनेही आणिती ॥२॥
स्पर्धा, असूया, मत्सर ।
पैसा, चैनींचीही भर ॥३॥
शांत जीवन जनांस ।
अळणी वाटते नीरस ॥४॥
दीन म्हणे शांताकारा ।
म्हणुनी तुजला नसे थारा !॥५॥
-- १९ --
कुठले क्षेत्र हे शोधावे ।
जेथे व्यवहारे तोषावे ॥१॥
असो रक्षण वा न्याय ।
किंवा शिक्षण, व्यवसाय ॥२॥
चाले बोले पैसा, सत्ता ।
कोणी बोलेना गुणवत्ता ॥३॥
ज्याला थोडे त्याचे आहे ।
भला परदेशी तो राहे ॥४॥
दीन विनवी गुणाधीशा ।
नको त्यागू अमुच्या देशा ॥५॥
-- २० --
पोट, डोळे तृप्त कान ।
मला कोठे नसो न्यून ॥१॥
दृष्टी जाते एवढीच ।
गाडी बंगला खर्चवेच ॥२॥
देव भाबड्यांचे काम ।
आम्ही विज्ञानी परम ॥३॥
देशसेवा, ज्ञानार्जन ।
वेडे करती ते चुकून ॥४॥
दीन म्हणे रे जगजेठी ।
अंजनाची करा वृष्टी !॥५॥
-- २१ --
आळसाचे नाही काम ।
अखंड कर्म हाचि धर्म ॥१॥
स्वधर्माचे कर्म तेही ।
नव्हे पोटासाठी काही ॥२॥
करी श्रम दोन्ही हाती ।
तेणे दुसर्याही जगवीती ॥३॥
उगा उपकार घेईना ।
ओझे कोणासी होईना ॥४॥
दीन म्हणे तो देवाचा ।
प्रिय तोही होतो त्याचा ॥५॥
--२२ --
पाहू आपुला अनुभव ।
थोडा जाणावया देव ॥१॥
देह पाहाती जरि डोळे ।
मन शोधूनी ना मिळे !॥२॥
परी ठरवी मन तैसे ।
देह चाले, बोले, बैसे ॥३॥
तसे चाले जग स्थूल ।
सूक्ष्म देव जे ठरवील ॥४॥
दीन म्हणे अव्यक्तासी ।
म्हणुनि शोधावे दिननिशी !॥५॥
-- २३ --
ज्याचे आणिले उधार ।
परत व्हावे हा व्यवहार ॥१॥
प्रसंगी घेतले जे कर्ज ।
जग घेतसे सव्याज ॥२॥
देण्या कर्ज प्रारब्धाचे ।
देह आणिती उधारीचे ॥३॥
परत द्यावे फिटता कर्ज ।
वरी सत्कर्मांचे व्याज ॥४॥
दीन म्हणे सावध चित्ता ।
नवे कर्म नको आता ॥५॥
-- २४ --
देव दिसेना डोळ्यांना ।
नका दोष देऊ त्यांना ॥१॥
जेथे जाणायाचे काम ।
तेथे इंद्रिये अक्षम ॥२॥
कर्म विश्वाकार ज्याचे ।
तेही आटोक्यापलिकडचे ॥३॥
कुठे आनंद ना दिसतो ।
परी जीवांना जाणवतो ॥४॥
दीन म्हणे रे देवाचे ।
तसे थोडे आहेे त्याचे !॥५॥
-- २५ --
येता परिमाण देवाचे ।
होई सोने आयुष्याचे ॥१॥
धाक वाटो वा आधार ।
देव स्वहिताचा ठरणार ॥२॥
अपूर्ण सृष्टीचा सोहळा ।
देव येता पूर्ण कळा ॥३॥
बाकी अवघे येती जाती ।
देव उरतो आदीअंती ॥४॥
दीन म्हणे जाणी देव ।
तोचि शोभतो मानव !॥५॥
-- २६ --
ज्याची वापरतो काया ।
त्याचे नाम नको का घ्याया ?॥१॥
देव मावेना तर्कात ।
अनुसंधानी खरे भक्त ॥२॥
देणेघेणे न लगे त्याला ।
एक भाव ये कामाला ॥३॥
सकळ जीवांचे ज्या प्रेम ।
त्याच्या हृदयी त्याचे धाम ॥४॥
दीन म्हणे ऐके मना ।
नाम वर्म अनुसंधाना !॥५॥
-- २७ --
जळीस्थळी भूतमात्री ।
भरिली देवाने धरित्री ॥१॥
तुमचे दर्शन जीवा आहे ।
तरी देवा उणे आहे ॥२॥
प्रतिबिंब धरू जाता ।
न ये सूर्य कधी हाता ॥३॥
म्हणुनि देवा आता आस ।
मिळवी मजला स्वरूपास ॥४॥
पाठाअंती दया दावा ।
उद्धरावे दीन जीवा ॥५॥
-- श्रीराम --
