रचना क्र. 20
श्री विष्णूची आरती
श्री पेठेकाका
ओवाळूया जय नारायण विष्णु परब्रह्मा ।
जय जय विष्णु परब्रह्मा ॥
सहस्रज्योती उजळू गाऊ अगाध तव महिमा ।
देवा अगाध तव महिमा ॥धृ॥
अनंत वर्षे अगणित रूपे निर्मियली सृष्टी ।
देवा निर्मियली सृष्टी ॥
संकल्पाचा खेळ तुझा हा दिपवी जनदृष्टी ।
देवा दिपवी जनदृष्टी ॥१॥
जगड्व्याळ हा व्याप न कळतो अतर्क्य तव लीला ।
देवा अतर्क्य तव लीला ॥
कार्यकारणे जीवन घटना चक्रे चालविला ।
देवा चक्रे चालविला ॥२॥
थोर व्यास ते सहस्र नामे अपूर्व तव गाती ।
देवा अपूर्व तव गाती ॥
किती वर्णिले तरी पलिकडे तू व्यापुन उरशी ।
देवा तू व्यापुन उरशी ॥३॥
तूच ब्रह्म तू संहारक तू पालक तू होशी ।
देवा पालक तू होशी ॥
स्मरण-चिंतने दीनभक्त हे बंधमुक्त करिशी ।
देवा बंधमुक्त करिशी ॥४॥
