रचना क्र. 16
श्री कालभैरवाची आरती
श्री पेठेकाका
हे स्वयंभु शंभुशिवा, काळभैरवा, काळभैरवा..।
जय जय काळभैरवा ॥धृ॥
ब्रह्मा जे निर्मितसे ।
विष्णू प्रतिपाळितसे ।
विलया तुज अर्पितसे ।
देउनि त्या उत्तम गति, जन्म दे नवा ॥१॥
काळभैरवा, जयजय..
सत्याची कास धरिति ।
रजकर्मा शुद्धि देति ।
जे तमास दूर करिति।
रक्षण दे सत्कार्या, आणि त्या जिवां ॥२॥
काळभैरवा, जयजय..
येता दुर्भाव कुठुन ।
करि त्यांचे निर्दालन ।
भक्तांवरि छत्र धरुन।
दीन जना अभय देई, जिंकण्या भवा ॥३॥
काळभैरवा, जयजय..
