रचना क्र. 53
खंत वाटे देवा आम्ही झालो भूमिभार
श्री पेठेकाका · null
null
खंत वाटे देवा आम्ही झालो भूमिभार ।
पदोपदी शिकूनिया अज्ञ राहणार ! ॥धृ॥
घडो घडी काळ जातो
पुन्हा संधी कोण देतो
सारे काही कळले तरी, वेळ दवडणार ! ॥१॥
क्षणो क्षणी सावध केले
जागे करुनी बोधविले
तरी नाही भानावरी, जगी रमणार ! ॥२॥
साधन आम्हा हाती दिले
देवा किती सोपे केले
किती काळ सबबी वरुनी, साधन चुकविणार ? ॥३॥
भूक दिली, अन्न दिले
खाण्यासाठी हात दिले
दृढ बुद्धी दीना देऊनी, न्या हो पैलपार ! ॥४॥
